बुद्धपौर्णिमेपासून स्टार प्रवाहवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका कोण साकारणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. आता अभिनेत्री शिवानी रांगोळे ही भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड उत्सुक असल्याचे समोर आले आहे.
रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचे उच्च शिक्षण असो, आंदोलने असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावली प्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळले. महापुरुषाची सहचारिणी होण्याचे व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळले. अशा या थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे असे शिवानीला वाटते.
या भूमिकेविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातली ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि ठेहराव असणारे हे कॅरेक्टर आहे. या भूमिकेसाठीचा पेहराव, भाषा यागोष्टीसुद्धा माझ्यासाठी नवे आव्हान आहे. धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचे वाचन मी करतेय. रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मला याचा फार उपयोग होतोय. यासोबतच दशमी प्रोडक्शन, स्टार प्रवाह वाहिनी आणि माझे सर्वच सहकलाकार यांच्या पाठिंब्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मला मदत होतेय. रमाबाईंचे कार्य अपार आहे. त्यांचे कार्य या मालिकेतून पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन’ असे शिवानी म्हणाली.