आज कलाविश्वामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कलाविश्वाशी काडीमात्र संबंध नसलेल्या व्यक्तींशी संसार थाटला आहे. यामध्ये माधुरी दीक्षित, स्वप्नील जोशी आणि किशोरी गोडबोले यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. माधुरी दीक्षितचे पती परदेशातील एक नामवंत डॉक्टर आहेत. तर किशोरी गोडबोलेचे पती चक्क परदेशामध्ये दिवाळीचा फराळ विकतात. विशेष म्हणजे परदेशामध्ये त्यांच्या फराळाला प्रचंड मागणी असल्याचं पाहायला मिळतं.
‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेमुळे नावारुपाला आलेल्या अभिनेत्री किशोरी गोडबोलेचे पती सचिन गोडबोले परदेशामध्ये दिवाळीचा फराळ विकून कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. विशेष म्हणजे सचिन यांनी आईच्या शब्दाखातर एका नामवंत कंपनीला रामराम करत आपल्या वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांचा हा व्यवसाय परदेशापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
सचिन गोडबोले यांच्या आई सुमती दिनकर गोडबोले या पाककृतीमध्ये विशेष पारंगत होत्या. त्यामुळे एक छोटेखानी व्यवसाय करण्यास त्यांनी सुरुवात केली. प्रथम त्यांनी ५ पदार्थ विकून व्यवसायाची सुरुवात केली. त्यानंतर हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढू लागला. याचदरम्यान, त्यांचा मुलगा सचिन हा जपानमधील एका नामवंत कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करत होता. मात्र वडिलांच्या निधनानंतर त्याने जपानमधील नोकरी सोडली आणि आपल्या आईला व्यवसायात मदत करु लागला. त्यांनी मुंबईमध्ये पहिलं घरगुती पदार्थांचं दुकान सुरु केलं. विशेष म्हणजे त्यांच्या पदार्थांची लोकप्रियता आणि मागणी इतकी वाढली की थेट परदेशातून त्यांच्या पदार्थांना मागणी येऊ लागली. इतकंच नाही तर अभिनेत्री माधुरी दीक्षित ज्यावेळी परदेशात स्थायिक झाली त्यावेळी तिच्या घरी दिवाळीमध्ये खास गोडबोले यांच्याकडूनच फराळ यायचा.
माधुरीच्या निमित्ताने परदेशात पोहोचलेला फराळ हळूहळू परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या घरी पोहोचू लागला आणि तेथे या फराळाची मागणी वाढू लागली. विशेष म्हणजे कोणतंही काम छोटं नसतं हे सचिन गोडबोले यांच्या व्यवसायाकडे पाहून लक्षात येतं.
दरम्यान, सचिन गोडबोले यांची पत्नी किशोरी गोडबोले ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘माधुरी मिडलक्लास’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘हद कर दि’, ‘एक दो तीन’, ‘खिडकी’, ‘मेरे साई’ यासारख्या हिंदी मराठी मालिका तिने आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत. ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘कोहराम’, ‘वन रूम किचन’ हे चित्रपट तिने गाजवले आहेत.