मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘प्रेम करु या खुल्लम खुल्ला’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. मराठी कलाविश्वामध्ये या चित्रपटाचं स्थान आजही अढळ आहे. याच चित्रपटामुळे मराठी कलाविश्वाला किशोरी शहाणे हा नवा चेहरा मिळाला. १७ व्या वर्षी पहिला चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक मिळविला. अफाट चाहतावर्ग असलेल्या या अभिनेत्रीने चित्रपट दिग्दर्शक दिपक बलराज वीज यांच्यासोबत लव्ह मॅरेज केलं असून त्यांची लव्ह स्टोरी फार रंजक आहे. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली.
अकरावीत असताना किशोरी यांनी ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन होईपर्यंत जवळपास २० चित्रपटांमध्ये काम केलं. मराठी कलाविश्वात दबदबा निर्माण झाल्यानंतर किशोरी यांनी त्यांचा मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळविला होता. याचदरम्यान त्यांची ओळख दिपक वीज यांच्यासोबत झाली आणि त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास सुरु झाला.
चित्रपट दिग्दर्शक दिपक वीज ‘हप्ता बंद’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते. त्यावेळी चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांना सोज्वळ आणि शांत वाटेल अशा अभिनेत्रीची गरज होती. त्यातच ही भूमिका एखादी मराठी अभिनेत्री उत्तमरित्या साकारु शकते असा विश्वासही त्यांना होता. त्यामुळे अशा अभिनेत्रीच्या शोधात ते होते. त्यातच किशोरी आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यात चांगली मैत्री झाली होती. त्यांमुळे जॅकीने ‘हप्ता बंद’साठी दिपक यांना किशोरीचं नाव सुचवलं. त्यानंतर दिपक आणि किशोरी यांची पहिली भेट फिल्मिस्तान स्टुडीओमध्ये झाली आणि पहिल्या भेटीतच दिपक यांनी किशोरीला चित्रपटासाठी फायनल केलं.
वाचा : ओळखा कोण आहे ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री? तिच्या सौंदर्यावर आज लाखो फिदा
‘हप्ता बंद’च्या निमित्ताने किशोरी आणि दिपक यांची रोजच भेट होत होती. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. इतकंच नाही तर त्यांचे कुटुंबीयदेखील एकमेकांना ओळखू लागले होते. जवळपास ३ ते ४ वर्ष या दोघांमध्ये मैत्री होती. एक दिवस किशोरी यांनी अचानकपणे दिपक आपण लग्न करायचं का असा प्रश्न विचारला. विशेष म्हणजे दिपक यांनीदेखील पहिल्याच प्रश्नामध्ये त्यांचा होकार दिला.
दरम्यान, दिपक आणि किशोरी यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या घरातल्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे २१ डिसेंबर रोजी त्यांनी लग्न गाठ बांधली. किशोरीने दिपक यांच्या ‘हप्ता बंद’, ‘बॉम्ब ब्लास्ट’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लग्नानंतर किशोरी यांनी काही हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं. त्यातल्या ‘घर एक मंदिर’, ‘ जस्सी जैसी कोई नही’, आणि ‘सिंदूर’ या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तर ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ हे मराठी चित्रपट तुफान लोकप्रिय झाले.