अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरेने २९ जुलै रोजी नांदेमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यात असल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच मयुरी देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. मयुरीने आशुतोषच्या वाढदिवसाच्या (११ ऑगस्ट) निमित्ताने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने केकचा फोटोही शेअर केला आहे.
काय म्हटलं आहे इन्स्टाग्राम पोस्टमध्ये –
“आशुडा, तुझ्या वाढदिवसाला हा सर्वोत्तम केक तयार करण्यासाठी लॉकडाउनमध्ये मी ३० केक तयार केले. तू त्या सर्व केकचा पहिला घास घेतला होतास, पण हा केक…३० वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का ? आपल्या प्रियजनांसाठी अनेक प्रश्न तू अनुत्तरित ठेवले आहेस..
आम्हाला माहिती आहे की, तू जे केलंस तो भ्याडपणा नाही तर गेल्या कित्येक काळापासून नैराश्यासोबत सुरु असलेल्या संघर्षातून आलेली असहाय्यता होती. पण गुणी बाळ माझं ते, आपण नैराश्यावर मात करण्याच्या फार जवळ आलो होतो. आपण किती चांगलं काम करत होतो…फक्त अजून थोडे कष्ट घेण्याची गरज होती..
प्रत्येक दिवशी, प्रत्येक सेंकदाला आपल्याला वाटत होतं की अजून थोडा संयम, अजून थोडा धीर आणि नंतर एक निरोगी आणि आनंदी आयुष्य तुझ्यासाठी…आपल्यासाठी वाट पाहत आहे. मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास याबद्दल तुझा राग करावा की जितका वेळ माझ्यासोबत होतास त्यासाठी आभार मानावेत? पण आता त्याने काय फरक पडतो?
तुझ्या आत्म्याचा शांततेत प्रवास व्हावा आणि देवदूत तुला योग्य मार्गदर्शन करतील यासाठी आम्ही सतत प्रार्थना करत असतो. आता देवदूतांचं ऐक, नेहमीप्रमाणे हट्टीपणा करु नकोस…
मी, अभी, मम्मी, पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू असताना आम्ही ते पुरेपूर व्यक्त केलं असावं अशी आशा आहे..इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतकं प्रेम केलंस, मीदेखील तेच करेन”
वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझीच
#बायकोतुझीनवसाची