मराठी चित्रपटसृष्टीतील आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे ही जोडी सर्वांनाच आवडते. आदिनाथ आणि उर्मिलाच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या घरी गोड बातमी आली आहे. महेश कोठारे आजोबा होणार असून अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे लवकरच आई होणार आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत उर्मिलाने ही गोड बातमी चाहत्यांना दिली. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये उर्मिलाचा बेबी बंप पाहायला मिळतोय. ‘आयुष्यातील या महत्त्वपूर्ण टप्प्याला मी एन्जॉय करतेय,’ असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय. उर्मिला आणि आदिनाथ यांचे हे पहिले बाळ आहे. २० डिसेंबर २०११ रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली होती. लग्नाच्या ५ वर्षांनी उर्मिला आई होणार आहे.

एका चित्रपटाच्या निमित्ताने उर्मिला आणि आदिनाथची पहिल्यांदा भेट झाली होती. दोघांची प्रेमकथाही चांगलीच मजेशीर आहे. ‘शुभ मंगल सावधान’ हा उर्मिलाचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील म्हणजेच महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी गेली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यात एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केलं होतं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०११ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले.