गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मराठी कलाकारांचा ‘फ’च्या बाराखडीचा व्हिडिओ चांगलाच ट्रेंड होतोय. मिथिला पालकर, स्वानंदी टिकेकर, सुव्रत जोशी, सखी गोखले, अमृता खानविलकर अशा काही कलाकारांनी सोशल मीडियावर ‘फ’ची बाराखडी म्हणतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. आता कलाकार ‘फ’ची बाराखडी का म्हणू लागले, असा प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर ‘फास्टर फेणे’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा आगळावेगळा फंडा वापरण्यात येतोय.

अभिनेता अमेय बेर्डेची मुख्य भूमिका असलेला ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘फास्टर फेणे’ हे प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत यांनी जिवंत केलेलं एक लोकप्रिय पात्र. भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजलेलं. बनेश उर्फ फास्टर फेणेच्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं.

वाचा : ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्याचे ऐकून सुनील पालला अश्रू अनावर

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. त्याच्याच प्रमोशनसाठी मराठी कलाकार सोशल मीडियावर #FaFe या हॅशटॅगसह ‘फ’च्या बाराखडीचा व्हिडिओ पोस्ट करत आहेत. जास्तीत जास्त प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटाचं हटके प्रमोशन कसं करता येईल, याकडे बरंच लक्ष दिलं जातं. प्रदर्शनापूर्वी एकप्रकारे वातावरणनिर्मितीच केली जाते. ‘फास्टर फेणे’च्या निमित्ताने ‘फ’ची बाराखडी म्हणत व्हिडिओ पोस्ट करण्याची भन्नाट कल्पना अनेकानांच आवडत असून सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.