गेल्या कित्येक दिवसांपासून चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या आगामी मालिकेची चर्चा रंगली होती. केदार शिंदे दररोज या मालिकेविषयीचा टप्प्याटप्प्याने उलगडा करत होते. मात्र, आज गुरुवारी अखेर त्यांनी या मालिकेवरील पडदा दूर सारला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मालिकेचं नाव जाहीर केलं आहे.

‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या गाजलेल्या मालिकेनंतर त्याच पद्धतीची प्रेक्षकांना आपलसं करणारी नवीन मालिका केदार शिंदे घेऊन आले आहेत. सुखी माणसाचा सदरा असं या मालिकेचं नाव असून या मालिकेत अभिनेता भरत जाधव मुख्य भुमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने भरत आणि केदार ही जोडगोळी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे.

दरम्यान, केदार शिंदे आणि भरत जाधव या दोघांनीही सोशल मीडियावर सुखी माणसाचा सदरा या मालिकेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही नवीन मालिका येत्या २५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे हे मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक असून त्यांनी आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट, नाटक, मालिका यांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या ‘हाउसफुल्ल’, ‘हसा चटकफु’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘जगावेगळी’, ‘साहेब, बिवी आणि मी’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा काही मालिका विशेष गाजल्या आहेत.