कलाक्षेत्र आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधील नातं नव्याने सांगण्याची गरज नाही. राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यामुळेच, कलाकारांचा गोतावळा नेहमीच राज ठाकरे यांच्या अवतीभोवती असतो. मराठी कलाकारांच्या मागे कायमच खंबीरपणे उभं राहणाऱ्या राज ठाकरे यांनी आता प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नव्या मालिकेविषयी भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या ट्विटरवर या नव्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं”, असं राज ठाकरे म्हणाले. या ट्विटसोबतच त्यांनी अन्य दोन ट्विटदेखील केले आहेत.

“भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना या अनिश्चिततेतून ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल…”, असंही राज ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- प्रतीक्षा संपली! केदार शिंदे घेऊन येतायेत ‘सुखी माणसाचा सदरा’

दरम्यान, राज ठाकरे कायमच मराठी कलाकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं पाहायला मिळतं. यापूर्वीदेखील राज ठाकरे यांनी मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळावे यासाठी आवाज उठवला होता. तसंच ते बऱ्याच वेळा कलाकारांच्या कामाचं कौतुकदेखील करत असतात. अलिकडेच त्यांनी अभिनेता, सूत्रसंचालक निलेश साबळे याला फोन करुन त्याचं कौतुक केलं होतं. ‘माझी मिमिक्री उत्तम करतोस असं’, ते म्हणाले होते.