मराठी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती प्रतिक्रिया देत असते. मात्र या प्रतिक्रियांमुळे अनेकदा तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ देखील येते. असाच काहीचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे केतकी विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. चित्रपट दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी देखील तिच्याबाबत राग व्यक्त केला आहे. तरुण पिढीला नावं ठेवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? असा सवाल त्यांनी केतकीला विचारला आहे.

महेश टिळेकर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमार्फत त्यांनी केतकीवर निशाणा साधला आहे. “केतकीने तिच्या पोस्टमधून, वक्तव्यामधून समाजात व तरुणांमध्ये द्वेष, तिढा कसा निर्माण होईल याचाच प्रयत्न केला आहे. मला केतकीला हेच विचारायचंय, जेव्हा महाराष्ट्रात दुसरी मोठी संकटं येतात, मग ती पूरजन्य परिस्थिती असो किंवा मग करोनाचा प्रादुर्भाव अशा वेळी तरुण पिढीच मदतकार्यात सर्वांत पुढे असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनून ते मदत करतात. तेव्हा केतकीने त्यांचं कौतुक केलं का? स्वत: काही केलंय का? त्यामुळे तरुणपिढीला नावं ठेवायचा तिला काय अधिकार आहे?”

“याच पोस्टमध्ये तिने तरुणपिढीचे प्रेरणास्थान हे ‘सैराट’मधील आर्ची आणि परशा हे आहेत असं सुनावलंय. ‘सैराट’मध्ये रिंकू राजगुरूऐवजी केतकी असती तर चित्रपट हिट झाल्याचा फायदा तिने निश्चितच घेतला असता. बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार, असा सवाल तिने पोस्टमध्ये केलाय. पण तिला आता त्यांच्याविषयी इतका कळवळा, प्रेम, आदर जाणवू लागलाय कुठून आला. सहा महिन्यांपूर्वी याच केतकीने एका विशिष्ट दिवशी त्या समाजातील लोक केवळ प्रवास मोफत मिळतो म्हणून मुंबई पाहण्याच्या उद्देशानेच मुंबईला येतात असा आरोप केला होता. तेव्हा तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले यांचं कार्य का आठवलं नाही आणि इतक्या लवकर तिचं मतपरिवर्तन झालं का?” असे प्रश्न महेश टिळेकर यांनी केतकी चितळे हिला विचारले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.