मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार आणि वेगळे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये रवी जाधवचे नाव आवर्जून घेतले जाते. त्याचा आगामी ‘न्यूड’ हा असाच एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा मुंबईत जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे. मात्र गोव्यात या महिन्याअखेर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (IFFI २०१७) हा चित्रपट वगळण्यात आला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांकडून याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

रवी जाधवने यासंदर्भात फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाला IFFIच्या ओपनिंग चित्रपटाचा बहुमान प्राप्त झाला असता. असो, वाईट त्या परीक्षकांचे वाटते. इतका वेळ देऊन प्रत्येक चित्रपट काळजीपूर्वक पाहून जर त्यांचा निर्णय अंतिम नसेल तर त्यांचा वेळ मुळात का वाया घालवला? चित्रपट कोणासाठी करायचा? प्रेक्षकांसाठी की मंत्रालयासाठी? तो बघायचा की नाही हे कोण ठरवणार? प्रेक्षक की मंत्रालय?,’ असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

वाचा : टीव्हीवर लवकरच कपिलचं पुनरागमन पण…

अभिनेता जितेंद्र जोशीनेही केंद्र सरकारवर उपरोधिक टीका केली. ‘अरेच्चा! मला वाटले होते की चित्रपट महोत्सव लोकांचे असतात. आज लक्षात आले की ते ‘सरकारी’ असतात,’ असे त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले.

महोत्सवाच्या परीक्षकांनी २६ चित्रपटांपैकी ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट आणि ‘एस दुर्गा’ हा मल्याळम चित्रपट स्क्रिनिंगसाठी निवडला होता. मात्र, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने परीक्षकांना कोणतीही कल्पना न देता अंतिम यादीतून हे दोन चित्रपट वगळण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी आता विनोद काप्रीचा ‘पिहू’ हा चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे.