जगातल्या केवळ १४ ‘अ’ दर्जाच्या फेस्टिवलपैकी एक मानला जाणारा ‘ब्लॅक नाइट्स’ हा फेस्टिवल इस्टोनिया देशातल्या टॅलिन या शहरात होणार आहे. १५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीत हा फेस्टिवल संपन्न होणार असून जगभरातल्या ७८ देशांमधून येणाऱ्या विविध सिनेमांपैकी २५० सिनेमे या सोहळ्यात दाखवले जातात. जगभरातून या फेस्टिवलला जवळपास ८० हजार सिनेरसिक हजेरी लावतात. विशेष म्हणजे या फेस्टिवलमध्ये मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांच्या त्रिज्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्त्वाची बाब म्हणजे या फेस्टिवलमध्ये झळकणारा त्रिज्या हा पहिला मराठी चित्रपट असणार  आहे. या आधी चीन देशात संपन्न झालेल्या ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’ या अतिशय मानच्या समजल्या जाणाऱ्या फेस्टिवलमध्ये  ‘त्रिज्या’ प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी जगातल्या अतिशय नामांकित अशा ‘द हॉलिवूड रिपोर्टर’ या ८८ वर्ष जुन्या आणि ‘स्क्रीन इंटरनॅशनल’ या १२२ वर्ष जुन्या मासिकात त्रिज्याचे वेगळेपण दर्शविणारे परिक्षणात्मक लेख झळकले.  त्रिज्यावर  जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. टॅलिनमध्ये जगभरातून  आलेल्या विविध भाषांमधल्या, विविध देशांमधल्या हजारो सिनेमांमधून ‘त्रिज्या’ या एकमेव व पहिल्या मराठी चित्रपटची निवड ही मराठी चित्रपटाच्या इतिहासातील विलक्षण अशी घटना आहे. मराठी चित्रपटासाठी व सिनेरसिकांसाठीही ही बाब नक्कीच कौतुकाची ठरणार आहे.

यापूर्वी ज्येष्ठ मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनावर आधारलेल्या मराठीतल्या पहिल्या Docu-Fiction सिनेमामुळे अक्षय इंडीकर यांचे नाव चर्चेत आले होते. तसेच या सिनेमाचा वेगळा बाज अनेकांच्या पसंतीसही उतरला होता. त्यामुळे अक्षय इंडीकर यांच्या आगामी सिनेमाची वाट अनेक सिनेरसिक अवर्जुन पाहात होते. कान्स येथे झालेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये ‘त्रिज्या’चा ट्रेलर दाखविण्यात आला होता. चित्रकथा निर्मितीचे अरविंद पाखले तसेच फिरता सिनेमा आणि  बॉम्बे बर्लिन फिल्म प्रोडक्शन्सचे अर्फी  लांबा व कॅथरीना झुकाले  यांनी  ‘त्रिज्या’ या सिनेमाच्या निर्मितीस हातभार लावला. बॉम्बे बर्लिन फिल्म्स हे इंडो-जर्मन प्रोडक्शन हाऊस आहे.  भारत आणि जर्मनी  या दोन देशांची निर्मिती असलेला त्रिज्या, हा मराठीतला अद्वितीय चित्रपट असणार आहे.  या चित्रपटाच्या लेखनाची, दिग्दर्शनाची आणि संकलनाची जबाबदारी अक्षय यांनी पेलली आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिका अभय महाजन यांनी साकारली असून त्यांच्यासोबत श्रीकांत यादव, गजानन परांजपे, चंदू धुमाळ, सोमनाथ लिंबरकर, वर्षा मालवडकर आणि गिरीष कुलकर्णी प्रमूख भूमिकेत आहेत. सिनेमाचे छायांकन स्वप्नील शेटे आणि अक्षय इंडीकर या दोघांनी  मिळून  केले आहे.