बॉलिवूडची ‘मस्तानी’ म्हणजेच दीपिका पदुकोण लवकरच ‘पद्मावती’ या चित्रपटातून राणी पद्मिनी यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात राजेशाही लूकमध्ये दिसणारी दीपिका सध्या शाही अंदाजातच सर्वत्र पाहायला मिळत आहेत. तिचा हा लूक काल झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार (मराठी) २०१७ सोहळ्यातही पाहावयास मिळाला. या सोहळ्यासाठी तिने प्रसिद्ध डिझाइनर सब्यासाची मुखर्जीने डिझाइन केलेली साडी नेसली होती. मात्र, या सोहळ्यात संजय लीला भन्साळीच्या ‘चंद्रमुखी’ची जेव्हा ‘पद्मावती’शी भेट झाली तो क्षण सर्वांचेच लक्ष वेधणारा ठरला.

वाचा : फिल्मफेअर पुरस्कार (मराठी) २०१७ विजेत्यांची संपूर्ण यादी

‘धक धक गर्ल’ म्हणजेच माधुरी दीक्षित नेने हीसुद्धा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तेव्हाच तिची आणि दीपिकाची भेट झाली. बॉलिवूडच्या ‘चंद्रमुखी’ आणि ‘पद्मावती’ने एकत्र काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. डिझायनर साडीमध्ये दीपिकाचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. कानात गुलाबी रंगाचे झुमके आणि केस मोकळे सोडून दीपिकाने तिचा लूक पूर्ण केला होता. तर दुसरीकडे, माधुरी ही पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत रेड कार्पेटवर झळकली. माधुरीने यावेळी अबोली रंगाचा ड्रेस घातला होता.

फोटो गॅलरी : ‘फिल्मफेअर पुरस्कार (मराठी) २०१७’ रेड कार्पेट

आपल्या मोहक हास्यासाठी नावाजली जाणारी माधुरी गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण, हिंदी चित्रपटांपासून दुरावलेली ही अभिनेत्री लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिच्या या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी चित्रपटाची कथा स्वतःचा आत्मशोध घेणाऱ्या महिलेवर आधारित असल्याचे म्हटले जातेय.