संदीप पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या कथानकावर आक्षेप घेत ब्राह्मण महासंघाने त्याच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केली. त्यानंतर आता पुण्यातील कोथरुडमध्ये सिटी प्राइड मल्टिप्लेक्सने हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. सिटी प्राइडकडून ‘बुक माय शो’ संकेतस्थळावीरल बुकिंगसह अन्य ऑनलाइन बुकिंगदेखील बंद करण्यात आलं आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुण्यातील काही थिएटर आणि मल्टिप्लेक्सना भेटी दिल्या आणि हा चित्रपट दाखवू नका, अशी त्यांना विनंती केली. १७ नोव्हेंबर म्हणजे उद्या ‘दशक्रिया’ प्रदर्शित होत आहे.
वाचा : ‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’
या चित्रपटात ब्राह्मण आणि हिंदू परंपरांची बदनामी केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा आणि त्याच्याशी निगडीत गोष्टींवर, सामाजिक विषमतेवर या सिनेमातून भाष्य करण्यात आले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून ६४ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.