काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर त्याच्या आगामी मराठी चित्रपटाविषयी घोषणा केली. अक्षयने एक व्हिडिओ पोस्ट करून ‘चुंबक’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाची प्रस्तुती तो स्वतः करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता चित्रपटाचा पहिलाच पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील तीन आघाडीच्या व्यक्तीरेखांपैकी एक असलेल्या ‘बाळू’ हे पात्रं या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे.

बाळूच्या या भूमिकेत पुण्याचा साहिल जाधव हा किशोरवयीन कलाकार पदार्पण करत आहे. या चित्रपटात बाळू एका रेस्तराँमधील वेटरच्या भूमिकेत आहे. आपलं छोटंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडत असतो.

वाचा : महेश बाबूच्या बॉलिवूड एण्ट्रीबद्दल पत्नी नम्रता शिरोडकरने केला खुलासा

आपल्याकडून व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय मिळावा म्हणून साहिलने रेस्तराँमध्ये काम केले आणि तेथील वेटर्सबरोबर तो काही दिवस राहीला. प्रख्यात लेखक, गायक, अभिनेता आणि दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे हे ‘चुंबक’मध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहेत. चुंबकचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन त्यांनी सौरभ भावे यांच्याबरोबर केले आहे. नरेन कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे.