विविध विषयांवर भाष्य करत साचेबद्ध कथानकांना शह देत मराठी चित्रपटातही काही प्रयोग करण्यात येत आहेत. याच प्रयोगांचं एक उदाहरण म्हणजे महेश मांजरेकरांचा आगामी चित्रपट ‘शिकारी’. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता विजू माने दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटातून विनोदी कथानक पाहायला मिळणार की हा चित्रपट अडल्ट कॉमेडी असणार याबद्दलच बरेच तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, हा ट्रेलर पाहता एक हटके कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं म्हणायला हरकत नाही. मृण्मयी देशपांडे पहिल्यांदाच अनोख्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. बोल्ड दृश्यांसोबतच यामध्ये दुहेरी अर्थांच्या संवादाचा भरणा आहे.

गाजलेली मराठी मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशी आणि नेहा खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. नेहा या चित्रपटातून पदार्पण करत आहे. याव्यतिरिक्त कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहेत.

वाचा : सुपरहिट ‘बबन’ने गाठला ८.५ कोटींचा पल्ला

या चित्रपटाच्या कथेबद्दल दिग्दर्शक विजू माने सांगतात की, ‘स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे.’ २० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.