टाईमपास चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकलेला दगडू अर्थात प्रथमेश परब पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे. ‘उर्फी’, ‘टाइमपास २’, ‘लालबागची राणी’, ‘३५% काठावर पास’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाची चुणूक दाखविणारा प्रथमेश लवकरच ‘टकाटक’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून चित्रीकरणादरम्यान प्रथमेश आजारी पडल्याचं समोर आलं आहे.

‘टकाटक’ या चित्रपटामध्ये प्रथमेश गण्या ही व्यक्तीरेखा साकारत आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रथमेश प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटातील एका सीनचं चित्रीकरण सुरु असताना प्रथमेश आजारी पडला होता. एका सीनमध्ये प्रथमेशला उसाचा रस प्यायचा होता. मात्र काही कारणास्तव या सीनसाठी अनेक वेळा रिटेक घ्यावे लागले. परिणामी, या रिटेकमध्ये त्याला वारंवार उसाचा रस प्यावा लागला आणि प्रथमेश आजारी पडला.

सीन चांगला व्हावा यासाठी प्रथमेश कसोशीने प्रयत्न करत होता. त्यामुळे रिटेक घेत असताना त्याला प्रत्येक वेळी एक एक घोट उसाचा रस पित होता. मात्र रिटेकमुळे जवळपास ८ ते ९ ग्लास उसाचा रस त्याला प्यावा लागला. अतिप्रमाणात हा रस प्यायल्यामुळे त्याला नंतर उलट्या सुरु झाल्या आणि तो आजारी पडला.

“हो, आम्ही खूप उन्हाळ्यात चित्रीकरण करत होतो. दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही त्या सीनच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. अगोदरच माझे पोट भरले होते. त्यात लागोपाठ ८ ते ९ ग्लास रस पोटात गेल्यावर मला मळमळायला सुरूवात झाली. चित्रीकरण सुरू होते. म्हणून सुरूवातीला मी काही बोललो नाही. पण नंतर मात्र माझ्या उलट्या सुरू झाल्या आणि मी आजारी पडलो,” असं प्रशमेश म्हणाला.

पुढे तो म्हणाला, “जेव्हा त्या सीनविषयी चर्चा झाली. तेव्हा मला तो सीन करताना एका घोटात उसाचा रस संपवायचाय, असे मी इम्प्रोवायझेशन करायचे ठरवले होते. जेव्हा मला ही कल्पना सुचली तेव्हा हे लक्षात आले नाही, की समजा रिटेक झाले तर याचे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात. मी सीनमध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह झालो की, किती रिटेक होत होते, आणि मी किती ग्लास पित होतो, याकडे लक्षच नव्हते. आता तो सीन बघताना खूप छान वाटतं. पण तेव्हा मात्र परफेक्शनच्या नादात चांगलाच आजारी पडलो.”

Story img Loader