कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. घरातल्या लहानापासून ते अगदी वृध्दांपर्यंत सर्वांनी एकत्र बसून पहावी आणि नुसतीच मनोरंजन म्हणून पाहू नये तर त्यातून बोध घ्यावा, अशी ही मालिका सादरीकरणातील वैविध्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. गेल्या दीड वर्षात या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना गणेशाच्या जन्मापासूनची कथा, दैवीलीला पाहता आल्या. बाल गणेशाचं गारुड प्रेक्षकांच्या मनावर कायमच राहणार आहे. परंतु, आता ही मालिका एक वेगळ्या वळणावर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मालिकेच्या कथानकामध्ये आलेल्या या वळणावर ब्रम्हवर्तात योगसाधनेसाठी गेलेला गणेश कित्येक वर्षांनी चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहे. या मालिकेच्या नव्या अध्यायाला लवकरच सुरुवात होणार आहे. गणपती बाप्पा मोरया ह्या मालिकेचे दुसरं पर्व सुरु होणार आहे. मालिकेमध्ये गणपती बाप्पा मोठा झाला असून, त्याच्याबरोबर रिद्धी–सिद्धीचे आगमन देखील या मालिकेत होणार आहे. मोठ्या गणेशाची भूमिका आदिश वैद्य साकारणार आहे.

विघ्नहर्त्या गणेशाची अशी कित्येक रूपं प्रेक्षकांना या मालिकेतून पहायला मिळाली. त्यामुळे आता एक नवा अध्याय पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण दिसतेय. या नव्या पर्वातील आगमनानंतर प्रेक्षकांना गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे, आणि ती म्हणजे गणेशाचं प्रापंचिक जीवन.
गणपतीच्या आयुष्यात रिद्धी आणि सिद्धीचं आगमन कसं होतं त्या दोघींचे स्वभाव कसे आहेत? त्याचे गणपतीच्या आयुष्यावर कसे पडसाद उमटतील? अन्नपूर्णा, आदिमाता म्हणजे पार्वती…आता सासूबाईच्या नव्या भूमिकेत कशी वावरेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या नव्या पर्वातून मिळणार आहेत. त्यामुळे, मोठ्या गणेशावरही तेवढचं प्रेक्षक भरभरून प्रेम करतील अशी आशा मालिकेच्या टीमतर्फे करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi serial ganpati bappa morya new season on colors marathi
Show comments