टेलिव्हिजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मराठी मालिका विश्वातही अशा बऱ्याच मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अशीच एक मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’. मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे, ओमप्रकाश शिंदे यांच्या मुख्य भूमिका असणारी ही मालिका आता एका रंजक वळणावर आल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘जाडूबाई जोरात’, ‘गाव गाता गजाली’ या मालिकांमागोमाग कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबतचीच उत्सुकता पाहायला मिळतेय. दरम्यान, मोनिका, मानसी आणि विक्रांत या तिघांभोवती फिरणारी ही मालिका निरोप घेणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक प्रकारची रुखरुखही आहेच. ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका वेगळ्या कथानकासोबतच आणखी एका कारणामुळे गाजली. ते कारण म्हणजे मालिकेचं शीर्षकगीत. ‘मी पहावे, तू दिसावे….’ असं म्हणत रात्री साडेआठच्या ठोक्याला घराघरात या मालिकेचं शीर्षकगीत वाजायचं. मुख्य म्हणजे श्रेया घोषालच्या सुरेल आवाजासोबतच हे गाणं पाहण्यातही तितकच रंजक होतं. मालिकेची कथाच या काही मिनिटांच्या शीर्षकगीतातून सादर करण्यात येत होती. त्यामुळे मालिकेच्या लोकप्रियतेतील हा एक महत्त्वाचा घटक आहे असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

दरम्यान, या मालिकेच्या जागी ‘तुझं माझं ब्रेक अप’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचे प्रोमो अधूनमधून प्रदर्शित करण्यात येत आहेत. ‘तुझं माझं ब्रेक- अप’ या नावावरुनच मालिकेचं कथानक अफलातून असल्याचं लक्षात येतं. तेव्हा आता हे ‘ब्रेक- अप’ प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader