प्रसिद्ध मराठी गायिका गीता माळी यांचे शहापूरजवळ अपघाती निधन झाले आहे. मूळच्या नाशिकच्या असणाऱ्या गीता या मागील काही महिन्यांपासून अमेरिकेमध्ये होत्या. भारतात परतल्यानंतर नाशिकला जाताना मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्या ३७ वर्षांच्या होत्या. या अपघातामध्ये त्यांचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बऱ्याच दिवसांनी भारतात परतल्याबद्दल त्यांनी फेसबुक पोस्टवरुन आनंद व्यक्त केला होता. घरी परतल्याबद्दल आनंद व्यक्त करणारी त्यांची ही फेसबुक पोस्ट शेवटची ठरली.
मागील तीन महिन्यापासून गीता या अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या. गुरुवारी सकाळी त्या मुंबईमध्ये दाखल झाल्या. मुंबई विमानतळावरुन पती अॅड. विजय माळी यांच्यासोबत त्या नाशिकच्या दिशेने रवाना झाल्या. दुपारी तीनच्या सुमारास शहापूरमधील लाहे फाटा येथे रस्त्यावरील एका कुत्र्याला वाचवण्याच्या नादात त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या इंधनाच्या टँकरला जाऊन धडकली. तातडीने या दोघांनाही शहापूरमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथे गीता यांना मृत घोषित करण्यात आले. गीता यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, सासु-सासरे, पती विजय, मुलगा मोहित असा परिवार आहे.
सकाळी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर गीता यांनी फेसबुकवर विमानतळावरील काही फोटो पोस्ट केले होते. यामध्ये त्यांनी भारतात परत आल्याचा आनंद व्यक्त केला होता. ‘जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है’ असं म्हणत त्यांनी तिरंग्याचा इमोन्जी पोस्ट केला होता. तसेच ‘बऱ्याच दिवसानंतर घरी आल्याने खूप आनंद होत आहे,’ असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. दुर्देवाने हिच त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट ठरली.
गीता यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर त्यांच्या अपघाती निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गीता यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली होती. गीता यांचे शालेय शिक्षण मराठा हायस्कूलमध्ये झाले. एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाचे अविराज तायडे, पंडित शंकर वैरागकर, मुंबई विद्यापीठाचे अच्युत ठाकूर यांच्याकडे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले. सुगम संगीतामध्ये त्यांनी स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली होती. याशिवाय अध्यात्म आणि ध्यान धारणेचीही त्यांना आवड होती. देश-विदेशात त्यांच्या गायनाचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. २०१७ साली ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या वीर सावरकर विश्व साहित्य संमेलनामध्ये त्यांनी गायन केले होते.