महेश टिळेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि त्यांचीच निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाने ५०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. आता येत्या २५ जून ते ५ जुलै या कालावधीत ‘मराठी तारका’चे प्रयोग लेह आणि सियाचेन येथे होणार आहेत. या दोन्ही ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम तेथे केला जाणार आहे.

‘मराठी तारका’चा पहिला प्रयोग पुण्यात झाला होता. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तसेच लंडन, दुबई, अमेरिका येथेही या कार्यक्रमाचे प्रयोग झाले आणि रसिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. आशा भोसले, शरद पवार, रेखा, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, पं. बिरजू महाराज, वहिदा रहेमान, हेलन आदी मान्यवरांनीही या कार्यक्रमाला आपली खास हजेरी लावली होती. रेखा आणि माधुरी दीक्षित यांनी तर ‘मराठी तारका’च्या कार्यक्रमात आपले नृत्य सादरीकरणही केले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनातही ‘मराठी तारका’चा विशेष खेळ रंगला होता.

sanjay raut
खासदार संजय राऊत म्हणाले, गद्दारीची कीड..
Sharad Pawar, Modi, Amul, fodder,
महाराष्ट्रात दुष्काळात चारा पाठविला म्हणून ‘अमूल’वर मोदींनी भरला होता खटला, शरद पवार यांचा आरोप
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
ashok chavan raj thackeray
राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

‘मराठी तारका’च्या कार्यक्रमात जयश्री टी, मधु कांबीकर, वर्षां उसगावकर, अलका कुबल, प्रिया बेर्डे, रेशम टिपणीस, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर, हेमांगी कवी ते आजच्या पिढीतील संस्कृती बालगुडे आदी पाच पिढय़ांमधील अभिनेत्री सहभागी झाल्या आहेत. ‘मराठी तारका’ कार्यक्रमातून टिळेकर यांनी सामाजिक भानही जपण्याचा प्रयत्न केला आहे. अंदमान येथे सुनामीग्रस्त गावातील नागरिकांसाठी तसेच भारत-पाकिस्तान सीमा भाग, बारामुल्ला, कारगिल आदी ठिकाणीही मराठी तारकांनी कोणतेही मानधन न घेता या कार्यक्रमाचे खेळ केले आहेत. पोलिसांची घरे, त्यांच्या मुलांचे शिक्षण यासाठी निधी उभारण्याकरिता कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी ठिकाणीही ‘मराठी तारका’चे प्रयोग झाले. तिकीट विक्रीतून पोलीस कल्याण निधीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी जमा झाला. पैठणी वीणकामगारांची संख्या हळूहळू कमी होत असतानाच्या पाश्र्वभूमीवर ‘मराठी तारका’ कार्यक्रमातून मराठी तारकांनी पैठणी परिधान करून पैठणीलाही मानाचे स्थान मिळवून दिले. आता लेह आणि सियाचीन सारख्या दुर्गम भागात भारतीय जवानांसाठी मराठी तारका तेथे आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.