सध्या टीव्ही मालिकांमधून लोकप्रिय झालेले चेहरे नाटकांमधून दिसत आहेत. या ट्रेण्डमागे नेमकं काय आहे? प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनाचा हेतू की व्यावसायिक गणितं याचा शोध घेण्याचा प्रयत्न-

मराठी सिनेमांचं चित्र आता बदलतंय, असं काही वर्षांपूर्वी म्हटलं जायचं. नवनवीन प्रयोग, विविध विषय, कलाकारांची तरुण फळी, तंत्रज्ञान, सशक्त आशय अशा साऱ्यांमुळे मराठी सिनेमांची बांधणी भक्कम होऊ लागली आहे. हिंदी-दाक्षिणात्य सिनेमांच्या स्पर्धेत आता मराठी सिनेमाही डोकं वर काढू लागला आहे. मराठी चित्रपटांतले वेगवेगळे ट्रेण्ड्स प्रेक्षकांची पसंती मिळवताहेत. ‘मराठी सिनेमांची अवस्था अतिशय वाईट आहे,’ असं बोलणाऱ्यांना मराठी सिनेकर्त्यांनी चोख उत्तर दिलंय. असंच चित्र आता मनोरंजन क्षेत्रातल्याच दुसऱ्या एका माध्यमात प्रकर्षांने दिसून येतंय. नाटक हे ते माध्यम. नाटकांची संख्या कमी, चांगलं नाटकंच येत नाहीत अशा तक्रारींना आता पूर्णविराम मिळालाय. कारण नाटकातही विविध प्रयोग होताहेत. नवनवीन ट्रेण्ड्स येताहेत. विशेष म्हणजे प्रेक्षक अशा नाटकांना दाद देताहेत. यातल्या नव्या ट्रेण्ड्सपैकी एक ट्रेण्ड ठळकपणे नजरेस पडतोय. वर्तमानपत्र उघडलं की नाटकांच्या जाहिरातींमध्ये असलेले चेहरे ओळखीचे आहेत. हे चेहरे प्रेक्षकांना रोज भेटतात, पण ते मालिकांमधून. हाच तो ट्रेण्ड. मालिकांमधले लोकप्रिय चेहरे नाटकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसताहेत. यात मनोरंजनासह व्यावसायिक गणितं असली तरी प्रेक्षक अशा नाटकांना पसंती देताहेत.

naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
star pravah new serial tu hi re maza mitwa starring sharvari jog and Abhijit amkar
नव्या मालिकांची मांदियाळी! ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन करतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, जाहीर केली मालिकेची वेळ अन् तारीख…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ

नाटक हे समाजप्रबोधनांच्या अनेक माध्यमांपैकी एक मानलं जातं. हेच माध्यम लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नाटकांमध्ये अनेक ट्रेण्ड्स वापरले जातात. सध्या मालिकांमधले कलाकार रंगभूमीवर येताहेत आणि त्या निमित्ताने बरेच विषय लोकांपर्यंत पोहोचताहेत. तेजश्री प्रधान, अदिती सारंगधर, शशांक केतकर, शीतल क्षीरसागर, राधिका देशपांडे, शिल्पा नवलकर, सचिन देशपांडे असे मालिकांमध्ये काम करणारे अनेक कलाकार नाटकांमध्ये दिसताहेत. त्यांची मालिकांमधली लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळे त्यांचा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक नाटय़गृहाकडेही वळू लागलेत. ‘मालिकांमधल्या कलाकारांसमवेत नाटक’ हा ट्रेण्ड लोकप्रिय होतोय. या ट्रेण्डविषयी याच कलाकारांनी आपापली काही मतं मांडली.

मालिकांमधल्या कलाकारांच्या लोकप्रियतेचा उपयोग नाटकांमध्ये केला जातो. त्यांच्या लोकप्रियतेमुळेच नाटकांना गर्दी होत असेल, असे विचार मनात येणं स्वाभाविक आहे. कलाकार याबाबत त्यांची मतं मांडतात. तेजश्री प्रधान आणि सचिन देशपांडे या दोघांचं म्हणणं असं आहे की, मालिकांमधल्या लोकप्रियतेमुळे नाटकाला गर्दी होते हे मान्य आहे, पण ही गर्दी जास्तीत जास्त २० ते २५ प्रयोगांपर्यंतच होईल. त्यापुढील प्रयोग नाटकाची संहिता, सादरीकरण, अभिनय, दिग्दर्शन अशा अनेक बाबींवर अवलंबून असतात. तेजश्री सांगते, ‘कुठलंही नाटक लोकप्रिय होत असेल तर ते त्यातील कलाकाराची मेहनत त्याच्या चेहऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते. काम करताना सहकलाकाराची साथही तितकीच मोलाची ठरते. ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी प्रशांत दामले नेहमी म्हणतात की, ‘जान्हवीला बघायला या आणि कांचनला सोबत घेऊन जा.’ सहकलाकार जुळवून घेणारा असला की काम करण्याची उत्सुकता वाढते.’

दुसरीकडे मालिकेतले कलाकार नाटकात हा ट्रेण्ड असल्याचं सचिन देशपांडे मान्य करतो, पण हे मान्य करताना तो त्याचा मुद्दा पटवून देतो. ‘नाटक चालणं किंवा न चालणं हे कलाकारावर नाही तर नाटकाची संहिता, कथा, विषय यांवर अवलंबून असतं. नाटकाला बुकिंग यावं याकरिता मालिकेतले कलाकार नाटकांमध्ये हा ट्रेण्ड आहे हे मी मान्य करतो; पण म्हणून प्रेक्षकांच्या गर्दीचं केवळ हे एकच कारण नाही, असंही मला वाटतं,’ सचिन सांगतो. एखादी वस्तू आकर्षक कागदात बांधून सजवली जाते. तसंच इथे ती वस्तू म्हणजे नाटक आणि आकर्षक कागद हे कलाकार आहेत. प्रेक्षक सुजाण आहेत. ते केवळ कागद बघून येत नाहीत. त्यांना त्या कागदाच्या आतली वस्तूही तितकीच महत्त्वाची वाटते, असंही सचिनचं मत आहे.

‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका नुकतीच संपली. या मालिकेतले मध्यवर्ती भूमिका करणारे सगळेच जण म्हणजे एकूण दहा कलाकार वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम करीत होते. यातल्या काहींच्या नाटकांचे प्रयोग आजही होताहेत. तेजश्री प्रधान ‘कार्टी काळजात घुसली’मध्ये, शशांक केतकर ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकात, राधिका देशपांडे आणि सचिन देशपांडे ‘ती दोघं’मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येताहेत. तर आशा शेलार ‘ग्रेसफुल’मध्ये दिसतात. अशाच इतरही काही मालिकांमधले कलाकार नवनवीन विषयांच्या नाटकांमध्ये दिसताहेत. अदिती सारंगधर स्टार प्रवाहच्या ‘लक्ष्य’ या मालिकेत उत्तम काम करतेय. तिचं अभिनयकौशल्य ‘ग्रेसफुल’ या नाटकातही प्रेक्षकांना बघायला मिळतंय. अदितीचं मत काहीसं वेगळं आहे. ती म्हणते, ‘मी दोन वर्षांत एक नाटक करतेच. त्यामुळे माझा प्रवास मालिका ते नाटक असा झालेला नाही, पण इतर काही कलाकारांचा नाटकाचा पाया भक्कम असतो, पण त्यांना मालिकाही खुणावत असतात. मात्र काही काळानंतर हेच कलाकार पुन्हा नाटकाकडे वळतात. या ट्रेण्डमध्ये नाटकाच्या व्यावसायिक गणितांपेक्षाही मला नाटकाची संहिता, कलाकारांचं काम जास्त महत्त्वाचं वाटतं. निर्मात्यांचीही नाटकाबाबत काही व्यावसायिक गणितं असतात. काही वेळा ही गणितं फसतात, काही वेळा यशस्वीही होतात. पण नाटय़कृतीच चांगली असेल तर मग अशा व्यवसायाच्या दृष्टीने केलेल्या स्ट्रॅटेजीचा त्यावर परिणाम होत नाही.’

टीव्ही या प्रभावी माध्यमातून दिसणाऱ्या कलाकारांचे चेहरे आता चटकन ओळखले जातात. ते लवकर लोकप्रियही होतात. मालिकांमधल्या कलाकारांची लोकप्रियता अलीकडे झपाटय़ाने वाढलेली दिसते. या लोकप्रियतेचा वापर विविध जाहिरातींमधून झालेला याआधीही बघायला मिळाला आहे. तसंच आता तो नाटकांमध्येही दिसून येतोय. अर्थात यामागे काही प्रमाणात व्यावसायिक गणितं आहेत, पण असा व्यावसायिकदृष्टय़ा विचार करणं गैर नाही. कलर्स मराठीच्या ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या कार्यक्रमात काम करणारी शिल्पा नवलकर ‘सेल्फी’ या नाटकात दिसतेय. तिला मात्र हा ट्रेण्ड मार्केटिंग स्ट्रॅटेजी वाटत नाही. ती स्पष्ट सांगते, ‘मालिकेत काम करताना कलाकाराच्या मनात समाधानाची भावना असते. सतत नवीन काही तरी करण्याची आस कलाकाराला लागलेली असते. तीच आस मालिकेतील कलाकाराला नाटकाकडे खेचून घेते. खासगी वाहिन्याचं जाळं पसरलं होतं तेव्हा काही तरी नवीन करायचं म्हणून नाटकातले कलाकार मालिकांमध्ये काम करायचे. तसंच आता पुन्हा नाटकाचं थोडय़ा फार फरकाने बदलेलं स्वरूप कलाकाराला खुणावतं आहे आणि म्हणून मालिकांमधले कलाकार नाटकाकडे वळताहेत.’

‘होणार सून..’मधली गीता सगळ्यांच्या लक्षात राहिली. खोडकर, थोडी बालिश, बिनधास्त अशी गीता सध्या ‘ती दोघं’ या नाटकात दिसतेय. ती या नव्या ट्रेण्डविषयी सांगते, ‘नाटक हा एक प्रयोग आहे आणि तो कोण्या एका कलाकारामुळे चालत नाही. त्यामध्ये सगळ्यांची मेहनत आहे. ‘दिखता है वो बिकता है’ असं जरी असलं तरीही विशिष्ट कलाकार नाटकात आहे म्हणून ते चालेलच याची शंभर टक्के खात्री नसते.’ हे तिचं मत असलं तरी मालिकांमधले कलाकार नाटकांमध्ये दिसू लागले की प्रेक्षक त्यांना प्रतिसाद कसा देतात याचं कारणही ती सांगते. ‘मालिकेतला कलाकार प्रेक्षकांच्या कुटुंबातला एक सदस्य झालेला असतो. तो मालिकेप्रमाणे प्रत्यक्षातही आहे का हे बघण्याची ओढ प्रेक्षकांच्या मनात असते. त्या ओढीने प्रेक्षक अशा नाटकांना गर्दी करतो; पण अशी गर्दी झाल्यानंतर ती गर्दी टिकवणं हे एका कलाकाराची जबाबदारी आहे’, असं राधिका सांगते. शशांक केतकर ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकातून प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळवतोय. नाटकातला हा नवा ट्रेण्ड तो सकारात्मकदृष्टय़ा घेतोय. तो म्हणतो, ‘या ट्रेण्डमुळे चांगले विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असतील तर त्याचा वापर करायला काहीच हरकत नाही, पण सोबतीला कलाकारांची मेहनतही हवीच.’

पूर्वी खासगी चॅनल्सची गर्दी नव्हती. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी कलाकारांना नाटक हा एकमेव पर्याय होता. आताच्या काळात मात्र खासगी चॅनल्सच्या अनेक पर्यायांमुळे कलाकारांच्या प्रवासाला मालिकांपासून सुरुवात होते. त्यानंतर मालिकेत लोकप्रियता मिळाली की ती खेचण्यासाठी नाटक, सिनेमा, जाहिरातींमध्ये दिसतात. नाटकापासून करिअरची सुरुवात झालेले अनेक कलाकार आहेत. त्यातले बरेच जण आजही रंगभूमीशी जोडलेले आहेत. त्यापैकीच शीतल क्षीरसागर ही अभिनेत्री. झी मराठीच्या ‘का रे दुरावा’ या मालिकेतली तिची शोभा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची वाहवा मिळवतेय. सध्या ती ‘तिन्हीसांज’ या नाटकात दिसतेय. ‘माझ्या करिअरचा प्रवास नाटकापासूनच सुरू झाला आहे. त्या वेळी खासगी चॅनल्स नसल्यामुळे नाटकाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता चित्र बदलतंय. नाटकाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया, त्यात होणार प्रयोग, विषयांचे नावीन्य अशा गोष्टींमुळे प्रेक्षक नाटकं बघायला येतो. त्यात कोणता कलाकार आहे हे बघून प्रेक्षक नाटक बघायला येत नाही. मी साकारत असलेली ‘शोभा’ ही व्यक्तिरेखा हे आता निमित्त झालं असलं तरी ते नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या गर्दीचं एकमेव कारण नाही. मालिकांमधले लोकप्रिय चेहरे नाटकात वापरण्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी मला पटत नाही. इतरांच्याही बाबतीत ते फारसं पटणारं नाही. कारण ते सगळेच कलाकार नाटकांमध्ये उत्तम काम करताहेत. एखादा कलाकार मालिकेकतला आहे म्हणून त्याला नाटकात घेतलं, अशी मालिकांमुळे प्रतिमा तयार झाली आहे. पण, मला वाटतं चांगलं ते टिकतंच. त्यासाठी कोणत्याही स्ट्रॅटेजीची गरज लागत नाही. पण, तरीही एखादा दिग्दर्शक एखादी चांगली संहिता लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मालिकांमधला एखादा चेहरा घेत असेल तर त्यात काहीच गैर नाही. यामुळे रंगभूमीकडे पाठ फिरवलेला प्रेक्षक जर परत येणार असेल तर हा ट्रेण्ड चांगलाच आहे,’ शीतल या नव्या ट्रेण्डचं स्वागत करते.

पूर्वी एखाद्या कलाकाराला मनोरंजन विश्वात करिअर करायचं असेल तर त्याला नाटकापासूनच सुरुवात करावी लागायची. कारण तेव्हा आजसारखे भारंभार चॅनल्स नव्हते. पण, आता चॅनल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नवोदित कलाकारांना करिअरची सुरुवात करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. नाटकातून करिअरच्या प्रवासाला सुरुवात केलेल्या या कलाकारांनी याविषयी आपापले विचार मांडले. तेजश्रीच्या मते, शिक्षणापासून, वाचनापासून सुरुवात करावी. सतत शिकत रहावं. शीतल मात्र नाटकापासूनच या क्षेत्रातली सुरुवात करावी असं सुचवते. नाटक हे माणसातला माणूस नव्याने शोधण्याचं एक प्रभावी साधन आहे, असं ती सांगते. राधिका आणि सचिन यांच्या मतांमध्ये काहीसं साधम्र्य आढळून आलं. त्यांच्या मते, प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान मिळवण्यासाठी सगळीकडे काम करणं महत्त्वाचं असतं. शशांक बदलणाऱ्या काळाचा विचार करत सांगतो की, काळाच्या बदलणाऱ्या प्रवाहासोबत जायला काहीच हरकत नाही. पण, प्रत्येकाने आपापली सदसद्विवेकबुद्धी वापरुन क्षेत्राची निवड करावी. अदितीचाही नाटकापासूनच सुरुवात करा असा आग्रह नाही. पण, प्रत्येक कलाकाराने नाटकाचा अनुभव घ्यावा, असंही ती सुचवते. शिल्पा थोडं वेगळ्या पद्धतीने मांडते, ‘नाटक, मालिका, सिनेमा यापेक्षा कलाकाराने नाटकाच्या बॅक स्टेजपासून करिअरला सुरुवात करावी. सत्यदेव दुबेंनी आम्हाला नेहमी म्हणायचे की नाटक शिका. त्यात अभिनयापेक्षाही विंगेत बसून शिकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी नाटकाचं बॅक स्टेज करावं.’

नाटक या माध्यमात आणखी काही बदल व्हावेत असंही या कलाकारांचं मत आहे. नाटकाचा आणखी प्रचार व्हावा असं सचिनला वाटतं. तर वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करण्याबाबत राधिका सुचवते. अधिकाधिक तरुणांपर्यंत नाटक हे माध्यम पोहोचायला हवं, असं शशांकचं म्हणणं आहे. शिल्पाच्या म्हणण्यानुसार पालकांनी त्यांच्या मुलांना नाटकं दाखवली पाहिजेत जेणेकरून त्यांना आपल्या रंगभूमीच्या संस्कृतीची सवय होईल. सोशल साइट्सवरून नाटकांचा प्रचार करण्याबाबत अनेकांनी सुचवलं. प्रेक्षकांचं नाटकावरचं प्रेम आजही तसंच आहे. काळ बदलत असल्यामुळे मनोरंजनाच्या माध्यमांमध्येही काहीसे बदल करावे लागतात. त्यात व्यावसायिकेता मुद्दा प्रामुख्याने पुढे येतो. पण, व्यावसायिकदृष्टय़ा विचार-आचार करणं यात गैर काहीच नाही. त्यासाठी करावे लागणारे नवनवीन प्रयोग, ट्रेण्डही प्रेक्षक उचलून धरतात. अशा ट्रेण्ड्सचे कलाकारांकडूनही स्वागत होते. पण, त्याच वेळी कलाकार म्हणून ते त्यांची जबाबदारी विसरत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यापेक्षा त्यांच्याकडे असलेली कला जास्त महत्त्वाची आहे हे ते सगळेच जाणून आहेत. नाटक पुढे यावं यासाठीच्या असंख्य स्टॅटेजी बदलल्या तरी कलाकाराचं, प्रेक्षकांचं रंगभूमीवरचं प्रेम नाटकाला पुढे आणेल यात शंका नाही!
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com