‘ग्ली’ या टीव्ही मालिकेतून प्रकाशझोतात आलेला मार्क सेलिंग गेली तीन वर्षे अभिनेत्री व लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली कोर्टाच्या पायऱ्या चढत होता. गुन्हेगारी क्षेत्रातील तज्ज्ञ वकील व आर्थिक ताकदीच्या जोरावर गेली अनेक वर्षे तो मोकाट बाहेर भटकत होता, मात्र सरतेशेवटी त्याच्या विरोधातील सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. परिणामी होणारा तुरुंगवास व समाजात झालेली बदनामी यांना घाबरून मार्कने शेवटी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. ३० जानेवारी २०१७ रोजी मार्क सेलिंगने आपल्या राहत्या घरी गळफास लावून वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षी आत्महत्या केली.

विकृत प्रवृत्तीच्या सेलिंगविरोधात २०१० ते २०१३ दरम्यान मोठय़ा प्रमाणावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले गेले; परंतु पैशाच्या जोरावर त्याने बरीचशी प्रकरणे कोर्टाबाहेरच संपवली. त्यातूनही जी प्रकरणे कोर्टात गेली त्यात पुराव्यांअभावी त्याची निर्दोष सुटका झाली; परंतु दुर्दैवाने पुन्हा एकदा २०१४ साली लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. या वेळी मात्र पोलिसांनी त्याला गजाआड पाठवायचे असे जणू ठरवलेच होते. दरम्यान मार्कविरोधात वाढत जाणारे आरोप व वृत्तमाध्यमांच्या दबावामुळे न्यायाधीशांनी हा खटला आणखीन गांभीर्याने घेतला. पोलिसांनाही त्यांच्यावर लावले गेलेले नामुष्कीचे आरोप पुसून काढायचे होते. त्यामुळे तपास प्रक्रिया जोरात सुरू झाली.

सेलिंगच्या राहत्या घरी पोलिसांना लहान मुलांची अश्लील छायाचित्रे, सीडीज, हार्ड डिस्क आणि इतर साहित्य मिळाले. तसेच त्याच्या फेसबुक, ट्विटर, जीमेल खात्यांवरही आक्षेपार्ह तपशील सापडले. पुढे या साहित्यात सापडलेल्या अभिनेत्री व लहान मुलांशी पोलिसांनी संपर्क साधला तेव्हा गेली अनेक वर्षे सेलिंग त्यांचा लैंगिक छळ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या भक्कम पुराव्यांच्या जोरावर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली; परंतु तज्ज्ञ वकिलांच्या चतुराईने पुन्हा एकदा काही काळ जामीन मिळवण्यात तो यशस्वी ठरला. हा संपूर्ण खटला गेली तीन वर्षे सुरू होता. त्याच्या इभ्रतीचे वाभाडे निघाले, चित्रपट क्षेत्रातून त्याची हकालपट्टी करण्यात आली. तो ज्या मालिकांमध्ये काम करत होता त्यातूनही त्याला डच्चू देण्यात आला, अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्याच्याविरोधात मोर्चे काढले. या सगळ्यामुळे मानसिकरीत्या खचलेल्या मार्कने कोर्टाने शिक्षा सुनावण्याआधीच आत्महत्या केली.