येत्या आठवड्यात अभिनेता संजय मिश्राचा ‘गेस्ट इन लंडन’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटांमध्ये चरित्र भूमिका साकारणारे संजय पुन्हा एकदा हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. खूप कमी लोकांना माहित असेल की, अभिनेता आणि कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेले संजय यांच्या आयुष्यात एकवेळ अशी आली होती जेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीला टाटा बाय-बाय केला होता. त्यानंतर ते एका छोट्या ढाब्यावर नोकरी करू लागले होते.

..म्हणून अभिनय सोडला होता
संजय यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ते अभिनय क्षेत्र सोडून ऋषिकेश येथे गेले. तेथे ते एका ढाब्यावर काम कारू लागले. खरंतर संजय त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होते. वडिलांच्या मृत्यूने त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि ते स्वतःला एकटं समजू लागले. त्यावेळी त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले होते. पण त्यांना हवेतसे यश तेव्हा मिळाले नव्हते. कदाचित त्यामुळेच ढाब्यावर काम करत असताना त्यांना कोणी ओळखले नसावे असे म्हटले जाते. ढाब्यावर ते भाज्या आणि ऑमलेट बनवत असत.

वाचा : तापसी पन्नू बनणार ऋषी कपूरची सून!

रोहित शेट्टीने काम दिले
दिग्दर्शक रोहित शेट्टीने काम दिले नसते तर कदाचित संजय मिश्रा यांनी ढाब्यावर काम करतच दिवस काढले असते असे म्हटले जाते. रोहित आणि संजयने ‘गोलमाल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर रोहित ‘ऑल द बेस्ट’ वर काम करत असतानाच त्याच्या डोक्यात संजयचा विचार आला. संजय चित्रपटांमध्ये परतण्यासाठी तयार नव्हते. पण रोहितने त्यांची मनधरणी करून पुन्हा काम करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर संजयने कधीच मागे वळून पाहिले नाही.

संपत्ती
संजय यांच्याकडे फॉर्च्यूनर आणि बीएमडब्लू यांसारख्या महागड्या कार आहेत. पाटणा आणि मुंबईत त्यांची काही घरं आहेत. आजच्या घडीला ते तब्बल २० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. १९९१ साली संजय मुंबईत आले होते. येथे नऊ वर्षे स्ट्रगल केल्यानंतर त्यांना पहिला ब्रेक मिळाला होता.‘चाणक्य’ मालिकेने सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याने चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशीच २८ वेळा रिटेक घेतला होता. त्यानंतर त्यांनी तिग्मांशु धुलियाच्या ‘हम बम्बई नहीं जाएंगे’ मध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले.

वाचा : ‘मला यापुढे पाकिस्तानात जायची संधी मिळेल?’

‘ओह डार्लिंग ये है इंडिया’ या १९९५ साली आलेल्या चित्रपटात संजय यांनी हार्मोनिअम प्लेयरची छोटीशी भूमिका साकारली होती. ‘सत्या’, ‘दिल से’, ‘फंस गए रे ओबामा’, ‘ मिस टनकपुर हाजिर हो’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘मेरठिया गँगस्टर्स’ आणि ‘दम लगाके हायेशा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेय. ‘मसाण’ चित्रपटात त्यांनी साकारलेली पित्याची भूमिका विशेष नावाजली गेली. यावर्षी ते जवळपास सात ते आठ चित्रपटांमध्ये झळकणार आहेत.