बॉलिवूडमध्ये जसजसं #MeToo प्रकरणांचा खुलासा होत आहे, तसतसे त्याचे परिणामसुद्धा पाहायला मिळत आहेत. अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी मोठमोठे कलाकार पुढे येत आहेत. त्यामुळे ही मोहीम पीडितांसाठी वरदान ठरतेय असं म्हणायला हरकत नाही. #MeTooच्या आरोपांची गंभीर दखल घेत अभिनेता अजय देवगणने त्याच्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी केली आहे. अजयचा मेकअप आर्टिस्ट हरीश वाधोने याच्यावर सहाय्यक दिग्दर्शिकेने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत.

‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हरीशने असभ्य वर्तन केल्याचा आरोप सहाय्यक दिग्दर्शिका तान्या पॉल सिंहने केला आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिका साकारत असून ‘प्या का पंचनामा’ सीरिज फेम लव रंजन त्याचं दिग्दर्शन करत आहे. सोशल मीडियावर #MeToo अंतर्गत तान्याने एक पोस्ट लिहिली आहे.

तान्याने लिहिलेली पोस्ट-

‘शूटिंगदरम्यान माझ्या खांद्यावर आणि पाठीवर एकाचा स्पर्श मला जाणवला. सुरुवातीला सेटवरची एखाची मुलगी मसाज करतेय असं मला वाटलं. माझ्या हातात बरेच फाइल्स होते म्हणून मी मागे वळून पाहिलं नव्हतं. पण नंतर मला समजलं की ती व्यक्ती हरीश होती. त्याला मी बरंच सुनावलं पण तरीही तो थांबला नाही. मी ही गोष्ट सेटवरील माझ्या एका महिला सहकारीला सांगितली आणि तिने क्रिएटीव्ह टीमकडे याची तक्रार केली. जेव्हा ही गोष्ट दिग्दर्शक लव रंजनकडे पोहोचली तेव्हा त्याने यासंदर्भात अजय देवगणसोबत चर्चा केली आणि दोघांनीही त्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.’

हरीश हा अजयचा सर्वांत जुना सहकारी होता. त्यामुळे त्याला सक्त ताकीद देऊन सोडतील असं मला वाटलं होतं. पण अजयने घेतलेल्या या कठोर निर्णयाबाबत मी अत्यंत आनंदी आहे, असंही तान्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपल्या पाठिशी उभं राहिल्याने तान्याने अजय देवगण, तब्बू आणि दिग्दर्शक लव रंजने आभार मानले.