चीनच्या सान्या येथे पार पडलेल्या मिस वर्ल्ड सौंदर्यस्पर्धेत भारताच्या मानुषी छिल्लरने बाजी मारली. त्यानंतर सोशल मीडियापासून ते अगदी कलाविश्वापर्यंत सर्व ठिकाणी मानुषीच्याच नावाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. एका रात्रीत स्टार झालेली मानुषी नुकतीच भारतात परतली असून, मुंबई विमानतळावर तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी चाहत्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. मुंबईला परतल्यानंतर तिने सोमवारी सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत आई, बाबा आणि लहान भाऊ असे संपूर्ण कुटुंबही उपस्थित होते. मानुषीने काकड आरतीला उपस्थिती लावून मनोभावे प्रार्थना केली.

२० वर्षीय मानुषीने १७ वर्षांनंतर मिस वर्ल्ड हा किताब भारताच्या नावावर केल्याने तिचे फार कौतुक होत आहे. ती मुंबईत आल्यावर तिला पाहण्यासाठी एकच झुंबड उडालेली. विमानतळावर झालेली गर्दी पाहता सुरक्षा यंत्रणांना त्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसले होते. सीआयएसएफचे जवळपास १२ अधिकारी तिथे उपस्थित होते. पण, त्यांनाही गर्दीला आवर घालता येणे कठीण झाले होते. दरम्यान, चाहते, माध्यमांचे प्रतिनिधी आणि सीआयएसएफचे जवान यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र मानुषीच्या चेहऱ्यावर मायदेशी परतल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.

https://www.instagram.com/p/Bb8KnhoDktb/

येत्या काही दिवसांमध्ये मानुषी बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावणार असून हैदराबाद येथे २८ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ग्लोबल आंत्रपिनरशिप समिट (जीइएस) मध्येही ती सहभागी होणार असल्याचे कळते. भारत आणि अमेरिका या दोन राष्ट्रांच्या संयुक्त विद्यमाने या समिटचे आयोजन करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/Bb8jND7j_oQ/