सध्या अभिनेते नाना पाटेकर त्याच्या आगामी ‘आपला मानूस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत नानांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी एक भावनिक वक्तव्य करत अनेकांचेच लक्ष वेधले. ‘राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही. त्यावेळी मी रागात बोललो होतो. रागवण्याने कोणी आपलं माणूस सोडतो का? राज काल माझा प्रेक्षक होता, आज आहे आणि उद्याही असेल’, असे नाना म्हणाले.

काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांविषयी मांडलेल्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर या दोघांमध्येही वादाची ठिणगी पडल्याचेही म्हटले गेले. पण, त्यावेळी आपण फक्त आपल्याला योग्य वाटले तेच वक्तव्य केले, असे मत मांडत नानांनी झाला वाद मोडित काढला. राजकीय मंच वेगळा आणि कलाकारांचा मंच वेगळा आहे, असे म्हणत नानांनी राजसोबत असलेल्या मित्रत्त्वाच्या नात्याची वेगळी बाजू सर्वांसमोर ठेवली.

वाचा : राजकारणातील प्रवेशाचा रजनीकांत यांनी गांभीर्याने विचार करावा- नाना पाटेकर

काही विषय हे त्याचवेळी विसरायचे असतात असे सांगत पुढे त्यांनी राजकारणाविषयीसुद्धा आपले मत मांडले. ‘मी कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. याउलट मी कायमच एक अभिनेता म्हणून व्यक्त होत राहीन. मी जर राजकीय पक्षात गेलो, तर पक्षप्रमुखालाच शिव्या घालत आठवडाभरात सर्व पक्ष फिरून घरी बसेन’, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.