बॉलिवूडमध्ये काही अभिनेते त्यांच्या सौंदर्यासाठी, सुदृढ शरीरयष्टीसाठी ओळखले जातात. ‘दे एज्ड लाइक अ फाइन वाईन’, ही ओळ काही अभिनेत्यांना पुरेपूर लागू होते. वयाच्या आकड्याचे भान नसणाऱ्या अशाच अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे मिलिंद सोमण. मॉडेल आणि अभिनेता म्हणून आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या मिलिंदने त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. कोणत्याही सेलिब्रिटी कुटुंबाचा वरदहस्त नसतानाही त्याने स्वबळावर हे यश मिळवले. सध्याच्या घडीला तो चित्रपटांमध्ये फारसा सक्रिय नसला तरीही सोशल मीडियावर मात्र त्याचीच चर्चा आहे हे नाकारता येणार नाही.

विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारा मिलिंद शारीरिक सुदृढतेकडे अधिक लक्ष देतो. अनवाणी पळण्यापासून ते अगदी योगसाधना आणि सोप्या मार्गाने कशा प्रकारे निरोगी राहता येईन याच्या टीप्स देण्याकडे त्याचा कल असतो. नवीन वर्षातही त्याचे असेच काही बेत असून, या दृष्टीने महत्त्वाचा असा एक संकल्प त्याने केला आहे. मिलिंदचा हा संकल्प सर्वसामान्यांसाठीही फार उपयोगाचा ठरणार आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, रात्री नऊ वाजल्यानंतर फोन ते अगदी मनोरंजनाची कोणतीही उपकरणे न वारपण्याचा संकल्प त्याने केला आहे.

अपूरी आणि अवेळी झोप, निद्रानाश या समस्या दूर करण्यासाठी त्याने हा संकल्प केला आहे. ज्यामुळे येत्या काळात नक्कीच त्याला फायदा होईल. #MyFitStart असा हॅशटॅग देत मिलिंदने एक ट्विट केले आहे. त्यासोबतच त्याने नवीन वर्षासाठी आपले काही बेतही सर्वांसमोर उघड कले. त्याविषयीचे ट्विट केल्यानंतर एका युजरने मिलिंदला ‘तू चांगल्या मार्गावर जात आहेस. पण, तू पळणे कधी थांबवणार?, असा प्रश्न विचारला. तिच्या या प्रश्नाचे उत्तर देत त्याने लिहिले, ‘जेव्हा हे जग (पृथ्वी) फिरायचे थांबेल तेव्हा माझे पळणे थांबेल’. मिलिंदने दिलेले हे उत्तर पाहून ठराविक गोष्टींविषयी असणारी त्याची समर्पकता स्पष्ट होते असे म्हणायला हरकत नाही.

VIDEO : फुटपाथवर झोपू नका, कारण ‘टायगर अभी जिंदा है’; राजू श्रीवास्तवने उडवली सलमानची खिल्ली

Story img Loader