हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ ज्या पार्श्वगायकांनी गाजविला त्यात मोहम्मद रफी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. रफी यांची आज ९३ वी जयंती. रफींचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी पंजाबच्या कोटला सुल्तान सिंह गावी एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. ते रफीसाहेब याच नावाने ओळखले जातात. आवाजाच्या या महान जादूगाराने १९८० पर्यंत संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले. रफी हे लौकिकार्थाने आपल्यात नसले तरी असंख्य अजरामर गाण्यांच्या रूपात ते भेटतातच, यापुढेही भेटत राहतील. कारण त्यांच्या गाण्यांची प्रत्येक पिढीला भुरळ पडत असते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या संगीतातील अनमोन रत्न रफी यांच्याबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात. त्याचसोबत त्यांच्या गाजलेल्या गाण्यांचीही एक झलक पाहुयात…
१. रफीसाहेबांचे टोपणनाव फीको असे होते.
२. गाण्याची प्रेरणा त्यांना एका फकिराकडून मिळाली होती.
३. रफी जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या भावाच्या सलूनमध्ये ते थांबायचे. त्यावेळी ते अवघ्या सात वर्षाचे होते. यावेळी त्यांच्या भावाच्या दुकानात एक फकीर येत असे. फकीर जेव्हा गाणे म्हणत शहरातून फिरत असे तेव्हा मोहम्मद रफी त्याचा पाठलाग करत त्याच्या गाण्याची नक्कल करीत असे.
४. रफी यांच्या या नकला आणि गाणी लोकांना खूप आवडायच्या. लोक त्यांची स्तुती करायचे. रफींचं गाण्याचं हे वेड पाहून त्यांचा मोठा भाऊ हमीद यांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिलं. हमीद यांनीच रफींना संगीत शिक्षणासाठी लाहोरमध्ये पाठवले. त्यांनी लाहोरमध्ये उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. त्याचसोबत गुलाम अलीखान यांच्याकडूनही भारतीय संगीताचे धडे गिरवले.
५. रफींनी वयाच्या तेराव्या वर्षी आपले पहिले गीत रसिकांसमोर सादर केले.
६. १९४८ मध्ये त्यांनी गायलेले ‘सुनो ऐ दुनियावालों बापूजी की अमर कहानी’ हे गाणे प्रचंड गाजले. तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी त्यांच्या निवासस्थानी रफींना गाण्यासाठी बोलावले होते.
७. रफीसाहेबांनी सुमारे पाच हजार हिंदी गाणी, त्यात मराठीसह इतर भाषा धरून सगळी मिळून २५ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याबरोबर गायली आहेत.