६५वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पार पडला. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्याने ५०हून अधिक पुरस्कार विजेत्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद काही वेळासाठीच उपस्थित राहिले आणि १२५ विजेत्यांपैकी ११ जणांनाच त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर इतरांना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावरूनच बऱ्याच कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑस्कर विजेता साऊंड आर्टिस्ट रसूल पुकुट्टीने सोशल मीडियावर सरकारला खडेबोल सुनावले.

जर सरकार पुरस्कार सोहळ्यासाठी तीन तासांचा वेळ काढू शकत नाही तर त्यांनी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार देण्याची तसदीही घेऊ नये, अशा शब्दांत रसूलने संताप व्यक्त केला. आमच्या कमाईच्या अर्ध्याहून अधिक मनोरंजन कर घेता तर किमान आमच्या कलेचा सन्मान तरी करा, असंदेखील तो ट्विटच्या माध्यमातून म्हणाला. तर फेसबुक पोस्टद्वारेही त्याने सरकारवर टीका केली. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देणाऱ्यांमध्ये फक्त मोठे सेलिब्रिटी आणि स्टार यांचाच समावेश का होता, असा सवालही त्याने उपस्थित केला.

Photos: ६५व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याची क्षणचित्रे

‘ज्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिला गेला नाही, ते अत्यंत सामान्य व्यक्ती, पडद्यामागे काम करणारे तंत्रज्ञ होते ज्यांना पुरस्कारांसाठी सर्वांत आधी बोलावलं जातं पण टीव्ही शोजमधून त्यांना एडीट केलं जातं,’ असं त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं.