आपल्या अफलातून डान्सच्या व्हिडिओने ४६ वर्षीय काका म्हणजेच संजीव श्रीवास्तव सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झाले. मध्यप्रदेशचे श्रीवास्तव प्राध्यापक असून त्यांच्या मेहुण्याच्या संगीत कार्यक्रमातील तो व्हिडिओ होता. अभिनेता गोविंदाच्या गाजलेल्या ‘आप के आ जाने से’ या गाण्यावरील त्यांच्या अफलातून डान्समुळे ते ‘डान्सिंग काका’ म्हणून ओळखू लागले. सोशल मीडियावर फक्त सामान्य नेटकऱ्यांकडूनच नाही तर बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या डान्सची प्रशंसा केली. अर्जुन कपूर, रवीना टंडन, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, दिव्या दत्ता यांसारख्या सेलिब्रिटींनंतर आता ‘स्ट्रीट डान्सर’ गोविंदानेही काकांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

सध्या लंडनमध्ये असलेल्या गोविंदाने यासंदर्भात ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बातचित केली. तो म्हणाला की, ‘अखेर मी तो व्हिडिओ नुकताच पाहिला. त्यांनी केलेला डान्स मला फार आवडला. माझी प्रत्येक स्टेप त्यांनी अचूकपणे केली आणि त्यां क्षणांना ते जगले. कित्येक अभिनेते माझ्यासारखं नाचण्याचा प्रयत्न करतात पण या काकांसारखा अफलातून डान्स कोणालाच जमला नाही.’

वाचा : उथळ शब्द वापरत मूळ चालीची मोडतोड केलेली रिमिक्स गाणी ऐकताना त्रास होतो- लता मंगेशकर

संजय श्रीवास्तव यांच्यासाठी तसंच नाचण्यासाठी कचरणाऱ्यांसाठीही गोविंदाने संदेश दिला. ‘नृत्याला काही वय नसतं. तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करत असता तेव्हा ते अमूल्य असतं. जेव्हा ते काका नाचत होते तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल की ते इतके प्रसिद्ध होणार आहेत. ते मनापासून आनंद घेत डान्स करत होते,’ असंही गोविंदा म्हणाला.

‘डान्सिंग अंकल’ संजीव श्रीवास्तव आता विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून निवडले गेले आहेत.