‘बीएमसीवर भरवसा नाय का?’ असं म्हणत मुंबई महापालिका प्रशासनाची ‘पोलखोल’ करणाऱ्या आरजे मलिष्काच्या अडचणी वाढल्या आहेत. विडंबनात्मक गाण्यातून महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या मलिष्कावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी शिवसेनेनं केली असतानाच आता तिच्या घरात अळ्या सापडल्यानं पालिकेच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. पालिकेनं मलिष्काच्या घरी नोटीस पाठवली आहे.

मलिष्काच्या ‘सोनू साँग’ला किशोरी पेडणेकरांकडून शिवसेना स्टाईल उत्तर

महापालिकेवर ‘भरवसा’ न दाखवणाऱ्या मलिष्काच्या टीकेनंतर शिवसेनेनं ‘राग’ व्यक्त करत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. हे कमी म्हणून की काय आता तिच्यावर पालिकेच्या कारवाईचं संकट घोंघावत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे पश्चिमेकडील पाली नाका येथील मलिष्काच्या घराची तपासणी केली. त्यावेळी त्यांना शोभेच्या कुंडीखाली ठेवण्यात आलेल्या भांड्यातील पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. एच वॉर्ड कार्यालयानं मलिष्काची आई लिली यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी पालिकेनं कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर ‘सोनू साँग’ची क्रेझ पाहायला मिळते. याच गाण्याचा आधार घेऊन रेड एफएमची प्रसिद्ध आरजे मलिष्कानं मुंबईच्या खड्ड्यांवर विडंबनात्मक मराठी गाणं तयार केलं होतं. या गाण्यातून मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले होते. ‘रेड एफएम’वर मुंबईच्या खड़्ड्यांचा विषय दरवर्षी नेटाने लावून धरणाऱ्या ‘मुंबईची राणी’ आर.जे. मलिष्कानं मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराला लक्ष्य करत ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का..’ हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं होतं.

शिवसेना मलिष्कावर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत

या व्हिडिओला अफाट प्रसिद्धी मिळाली. जवळजवळ सगळ्याच रेडिओ चॅनल्सनं आपले स्वतःचे सोनू व्हर्जन तयार केले होते. पण त्यामध्ये मलिष्काचा व्हिडिओ सर्वाधिक गाजला. मात्र, पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला ही ‘टीका’ फारशी रूचली नाही. ९३.५ रेड एफएमवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली होती