रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका व्यक्तीला खडेबोल सुनावतानाचा अभिनेत्री अनुष्का शर्माचा व्हिडिओ विराट कोहली सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या व्हिडिओवर अनेकजण व्यक्त होत असून आता कचरा फेकणाऱ्या मुलाच्या आईने विराट आणि अनुष्कावर संताप व्यक्त केला आहे.
इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून कचरा फेकणाऱ्या अरहान सिंगच्या आईने म्हटले की, ‘प्रसिद्धी मिळवण्यासाठी या दोघांनी माझ्या मुलाचा वापर केला आहे. स्वच्छतेच्या नावाखाली असा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करत एखाद्याची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाच नाही.’ तर व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी किमान मुलाचा चेहरा तरी ब्लर करायला हवा होता, असंही त्या पुढे म्हणाल्या. त्याचप्रमाणे स्वच्छतेची इतकीच आवड असल्यास आधी तुम्ही राहत असलेल्या परिसरात स्वच्छतेसाठी काहीतरी करा, असा सल्लादेखील त्यांनी विरुष्काला दिला.

वाचा : रणबीरचा ‘संजू’वरून सलमान खानवर पलटवार 

याआधी अरहान सिंगनेही सोशल मीडियावर पोस्ट टाकत विराट- अनुष्कावर निशाणा साधला होता. ‘माझ्या चुकीबद्दल मी माफीदेखील मागितली. पण अनुष्का शर्मा कोहली, तेच जर तू नम्रपणे सांगितलं असतंस तर स्टार म्हणून तुझं महत्त्व कमी झालं नसतं. स्वच्छतेच्या जाणीवेसोबतच बोलण्यातही थोडी सभ्यता असायला हवी,’ अशी पोस्ट अरहानने लिहिली होती.

काय आहे प्रकरण?

अनुष्का कारमधून प्रवास करत असताना समोरच्या कारमधून पाण्याची रिकामी बाटली बाहेर फेकण्यात आली. त्यावर संताप व्यक्त करत तिने दम दिला आणि पुन्हा असं न करण्याची तंबीही दिली. हा व्हिडिओ विराट कोहलीनं ट्विटरवर पोस्ट केला. अनुष्काचं अनेकांनी कौतुक केलं मात्र काहींनी नकारात्मक टिप्पणीसुद्धा केली.