प्रेरक चरित्रनाटय़
असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाने सामान्यजन प्रभावित होत असले तरी त्यांचं अनुकरण करून तशा प्रकारचं कर्तृत्व एखाद्या क्षेत्रात गाजवणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे अशीच त्यांची (रास्त) समजूत असते. ही माणसं महान आहेत, त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, अपार मेहनत आणि जिद्दीमुळेच त्यांना त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करता आलं असं सामान्यांना वाटत असतं. आणि ते खरंच आहे. या महानुभवांचं जीवन कितीही अद्भुतरम्य असलं तरी त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे कर्तृत्व गाजवणं हे सामान्यांच्या कुवतीबाहेरचंच असतं. मात्र, एखादी सामान्य व्यक्ती प्रचंड मेहनत आणि तिच्यातल्या विशेष गुणामुळे जेव्हा नेत्रदीपक कामगिरी करते तेव्हाअशा व्यक्तीकडे ‘रोल मॉडेल’ म्हणून पाहायला सर्वसामान्य माणसाला आवडतं. कारण ही व्यक्ती आपल्यासारखीच सामान्य असूनही हे करू शकते, तर मग आपल्याला ते का जमू नये, ही प्रेरणा अशा व्यक्तींच्या चरित्रातून त्यांना निश्चितपणे मिळू शकते. म्हणूनच महात्मा गांधी, डॉ. आंबेडकरांसारख्या व्यक्तींबद्दल लोकांना आदर असला तरीही त्यांच्याप्रमाणे आपण बनू शकत नाही याचीही जाणीव त्यांना असते. मात्र, लंडनच्या आजीबाई बनारसेंसारखी एक अशिक्षित, अडाणी स्त्री परक्या देशात, परक्या संस्कृतीत, तिथल्या भाषेचा गंधही नसताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे उभी राहते आणि कष्टपूर्वक खाणावळ चालवून परिस्थितीशी सामना करते.. एवढंच नव्हे तर प्रचंड मेहनतीने आपल्या कुटुंबाच्या डोक्यावर छप्पर तर मिळवतेच; शिवाय तिथं अनेक इमारतींची मालकीणही होते.. भौतिक सुखं, पैसा, नाव, प्रसिद्धी या सगळ्याची धनीण होते.. लंडनच्या बनारसे आजींचा हा अविश्वसनीय वाटावा असाच हा प्रवास आहे. बरं, त्या फ्कत आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठीच झटल्या असं नाही, तर ५०-६०-७० च्या दशकांत इंग्लंडमध्ये शिक्षण तसंच नोकरीधंद्यासाठी गेलेल्या अनेक भारतीयांवर त्यांनी मायेची पाखर धरली, त्यांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केलं. प्रसंगी सर्वतोपरी मदत करून तिथं त्यांना रुजण्यासाठी साह्य़ केलं. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. परक्या देशात मंदिर बांधून भारतीयांना एकत्र आणण्याचे माध्यम त्यांनी उपलब्ध करून दिलं. माणुसकीचा जिवंत झरा बनून जे उदाहरण स्वत:च्या आयुष्यातून त्यांनी घालून दिलं, ते अजोड आहे.
यवतमाळातल्या एका खेडय़ातली ही एक अशिक्षित, अडाणी स्त्री. पहिल्या लग्नापासून पाच मुली असलेल्या या बाईंचा नवरा अकाली गेला आणि ऐन पस्तिशीत त्या विधवा झाल्या. पण तोवर त्यांच्या तीन मुलींची लग्नंही झाली होती. उरल्या दोन मुली पदरात होत्या. नवऱ्यापश्चात सासरची मंडळी आणि परिस्थितीनं असहकार पुकारलेला. अशात जगायचं कसं, हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासलेला. याचदरम्यान विलायतेतील (लंडन) आबाजी हे विधुर गृहस्थ आपल्या गावी आले असताना कुणीतरी या विधवेची माहिती त्यांना दिली. आबाजींना आपण पुनर्विवाह करावा असं वाटत होतंच. त्यांनी या विधवेशी लग्न केलं आणि साधी गावची सीमाही न ओलांडलेली ही स्त्री चक्क लंडनला जाण्यासाठी आगबोटीवर चढली.
तिथं आबाजींच्या विवाहित मुलांना (विठ्ठल आणि पांडुरंग) वडलांचं हे दुसरं लग्न मंजूर नसल्यानं त्यांचं थंडंच स्वागत झालं. घरात राबायला एक गुलाम मिळाला, यापलीकडे त्यांना कुणी गृहीत धरलं नव्हतं. आबाजींची मुलं तिथं लॉजिंग-बोर्डिग चालवत होती. भारतातून शिक्षण व नोकरीसाठी लंडनला आलेल्या भारतीयांना निवारा आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था ते करीत असत. सावत्र नातवंडं त्यांना ‘आजी’ म्हणून हाक मारीत. साहजिकच इतरही त्यांना ‘आजी’ म्हणू लागले. एकीकडे घरात गुलामासारखं राब राब राबत असताना आजीबाई हळूहळू तिथली भाषा, संस्कृती, माणसं यांच्याशी परिचित होत गेल्या. त्यांच्या हाताला चव होती. त्यामुळे त्यांच्या खाणावळीला बरकत येत गेली. परंतु अचानक आबाजी गेले आणि बनारसे आजी पुन्हा रस्त्यावर आल्या. सावत्र मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं.
पुढं काय, हा प्रश्न पुनश्च आजीबाईंसमोर उभा राहिला. त्यांनी आपल्या कला आणि कमळा या मुलींना भारतातून बोलवून घेतलं आणि त्यांच्या साहाय्यानं त्यांनी शून्यातून सुरुवात केली. कर्ज काढून डोक्यावर छप्पर मिळवलं. त्यांच्या हातचं चवदार खाण्याची सवय झालेल्या विद्यार्थ्यांनीही त्यांना याबाबतीत मदत केली. अहोरात्र कष्ट करत आजीबाईंनी खाणावळीत जम बसवला. हळूहळू त्यांचा लौकिक सर्वदूर पसरू लागला. त्याकाळी भारतातून येणारी कला क्षेत्रातील मंडळी, यशवंतराव चव्हाण व इंदिरा गांधींसारखे नेते आजीबाईंच्या या कर्तबगारीनं प्रभावित झाले होते. आजीबाईंच्या अविश्रांत कष्टांना यश येऊन त्यांना स्थैर्य, पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक प्राप्त होत गेला. त्यांच्या मालकीच्या अनेक इमारती लंडनमध्ये उभ्या राहिल्या. लंडनमध्ये मंदिर बांधून भारतीयांना एकत्र येण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या पायाभरणीत आणि तिथल्या सांस्कृतिक उपक्रमांना आकार देण्यातही आजीबाईंचा मोलाचा वाटा आहे. ‘भारतीयांचा लंडनमधील आधारवड’ ही त्यांची ओळख त्यातून दृढ होत गेली. आजही लंडनमधील भारतीयांच्या मनात अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना अढळ स्थान आहे.
अशा बनारसे आजीबाईंचं प्रेरणादायी चरित्र सरोजिनीबाई वैद्य यांनी ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ या नावानं काही वर्षांमागे लिहिलं. त्यातून प्रेरित झालेल्या राजीव जोशींनी ‘लंडनच्या आजीबाई’ हे नाटक लिहिलं आहे आणि ‘कलामंदिर’ या संस्थेनं ते नुकतंच रंगभूमीवर आणलं आहे. चरित्रनाटय़ हा प्रकार तसा हाताळायला अवघड. त्यातही बनारसे आजींसारख्या सामान्य (अर्थात् कर्तृत्वानं महान असलेल्या) स्त्रीच्या आयुष्यावर नाटक लिहिणं याकरता अवघड, की लंडनशी संबंधितांना किंवा मराठी साहित्याचं बऱ्यापैकी वाचन असणाऱ्यांना त्या माहीत असू शकतात; परंतु इतरांना त्यांची माहिती असणं अशक्य. अशा अपरिचित व्यक्तिमत्त्वावरील नाटक प्रेक्षक स्वीकारतील का, हीसुद्धा एक रास्त भीती. त्यात ते कशा तऱ्हेनं सादर करायचं, हाही पेच. परंतु राजीव जोशी यांनी इंग्रजी भाषेत शिक्षण झालेल्या आणि मायबोलीशी नाळ तुटलेल्या एका तरुणीच्या माध्यमातून हे चरित्र उभं केलं आहे. या दोन-पात्री नाटकात लंडनच्या आजीबाईंची कहाणी कधी कथनातून, तर कधी रंगमंचीय सादरीकरणातून अशा दुहेरी गोफाद्वारे त्यांनी मांडली आहे. बनारसे आजींच्या चरित्रातील प्रसंग निवडतानाही त्यांनी त्यातले नाटय़पूर्ण क्षण नेमके हेरले आहेत. आजीबाईंचं व्यक्तिमत्त्व कसकसं घडत गेलं, त्यांचा कणखरपणा, दुर्दम्य आत्मविश्वास, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत असतानाच तिच्याशी दोन हात करण्याची त्यांची हिंमत, प्रचंड कष्टाळू वृत्ती, त्यांच्यातला माणुसकीचा गहिवर, द्रष्टेपण, त्यांची विनोदबुद्धी आणि ‘इदं न मम्’ ही जीवनधारणा.. हे सारं लेखकानं छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून छान रचत नेलं आहे. त्यातून लंडनच्या आजीबाईंचं ठसठशीत व्यक्तिमत्त्व तर उभं राहतंच; शिवाय त्याचबरोबरीनं मीरा या मातीशी व मायबोलीशी नाळ तुटलेल्या तरुणीचं हळूहळू होणारं व्यक्तिमत्त्व परिवर्तनही समांतरपणे त्यांनी उत्तमरीत्या गुंफलं आहे. आजींचं प्रेरक आयुष्य आजच्या संदर्भाशी जोडणं त्यांना त्यामुळे शक्य झालं आहे.
संतोष वेरुळकर या गुणी दिग्दर्शकानं (‘गमभन’, ‘अडगळ’, ‘बॉम्बे १७’ या नाटकांचे दिग्दर्शक!) हे चरित्रनाटय़ नाटककर्त्यांचा हेतू लक्षात घेत यथार्थपणे साकारलं आहे. आजीबाईंचं चरित्र आणि ते वाचता वाचता मीराचं संस्कारीत होत जाणं.. तिच्या मूल्यसंवेदनांचा विस्तार- हा सगळा प्रवास त्यांनी कौशल्यानं दाखवला आहे. आजीबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील नितळता, प्रचंड आशावाद, प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द आणि त्यांचं निखळ माणूसपण सहज-सोप्या शैलीत त्यांनी मांडलं आहे. परंतु मोजक्याच सूचक नेपथ्यामुळे रंगावकाश मात्र ओकाबोका जाणवतो. समीप रंगभूमीवर (इंटिमेट थिएटर) कदाचित हे तितकंसं जाणवणार नाही; परंतु व्यावसायिक रंगभूमीवर नाटकाचा प्रयोग सादर होताना त्याच्याकडून व्यावसायिक सफाईची मागणी अनाठायी म्हणता येणार नाही. यादृष्टीनं सगळ्याच तांत्रिक बाबींचा फेरविचार होणं गरजेचं आहे.
उषा नाडकर्णी यांचं बऱ्याच कालावधीनंतर रंगभूमीवर झालेलं पुनरागमन सुखद आहे. त्यांच्या उपजत व्यक्तिमत्त्वाला मुरड घालत त्यांनी साकारलेल्या बनारसे आजी अतिशय लोभस उतरल्या आहेत. आजींच्या व्यक्तिमत्त्वातील सूक्ष्म खाचाखोचा त्यांनी उत्तमरीत्या प्रकट केल्या आहेत. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या, प्रतिकूलतेत विजिगीषु वृत्तीनं उसळणाऱ्या, जीवनाकडे कायम सकारात्मक दृष्टीनं पाहणाऱ्या, प्रत्येक अडचणींत नवी संधी शोधणाऱ्या, अनुभवांतून आलेलं शहाणपण व्यवहारात उतरवताना माणुसकी जपणाऱ्या.. मुख्य म्हणजे आपल्यातील उणिवांनी किंचितही नाउमेद न होणाऱ्या या आज्जीबाई कुठल्या मुशीतून बनल्या आहेत असा प्रश्न पडावा. बनारसे आजींचं हे प्रवाहीपण उषा नाडकर्णी यांनी उत्कटतेनं पकडलं आहे.
मीरा झालेल्या वेदांगी कुलकर्णी यांनी मायबोली तसंच मूल्यसंस्कारांना पारख्या झालेल्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व केलं आहे. उत्तम पुस्तकांच्या वाचनातून, आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या उदाहरणांतून या संभ्रमित पिढीत संस्कार रुजवणं शक्य आहे, हा संदेशही नाटकातून दिला गेला आहे. वेदांगी कुलकर्णी यांची उत्फुल्ल तरुणाई मीरेच्या भूमिकेला साहाय्यभूत ठरली आहे. एक आश्वासक अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा करायला हरकत नसावी.
म्हटल्या तर सामान्य, पण प्रत्यक्षात माणूस म्हणून ‘असामान्य’ ठरलेल्या या ‘लंडनच्या आजीबाईं’ची रसिकांनी एकदा तरी भेट घ्यायला हवीच.