‘ज्युरासिक पार्क’ म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे महाकाय डायनोसोर्स आणि त्यांची दहशत. डायनोसोरचा हाच थरार ‘ज्युरासिक पार्क : फॉलन किंगडम’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. २०१५ मध्ये प्दर्शित झालेल्या ‘ज्युरासिक वर्ल्ड’ या चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘ज्युरासिक पार्क : फॉलन किंगडम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. क्रिस प्रॅट आणि ब्राइस डलास या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ओवन आणि क्लेअर यांच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटाचा ट्रेलर पाहतानाच चित्रपटाच्या भव्यतेची कल्पना येते . कलाकारांचे अभिनय, ट्रेलरचे पार्श्वसंगीतही जमेची बाजू ठरत आहे. मनुष्य प्रजाती आणि डायनासोर यांच्यामध्ये होणाऱ्या युद्धाचा थरार या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये एक प्रश्न प्रेक्षकांनाही विचार करायला भाग पाडतोय. ‘इतर सर्व प्रजातींना दिले जाणारे संरक्षण या प्राण्यांना (डायनोसोरला)सुद्धा मिळायला हवे का?’, हा प्रश्न ऐकल्यानंतर चित्रपटात फक्त थरारच नाही तर कलाकारांचे अभिनय कौशल्य पाहण्याची संधी मिळणार असल्याचेही स्पष्ट होते.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

जे.ए. बयोना दिग्दर्शित या चित्रपटातून जस्टिस स्मिथ, जेम्स क्रोमवेल आणि टॉबी जोन्स हे कलाकारही झळकणार आहेत. २२ जून २०१८ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ज्युरासिक पार्क’ सीरिजमधील प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तेव्हा आता ‘ज्युरासिक पार्क : फॉलन किंग्डम’लाही प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.