रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या प्रत्येक कलाकाराची एक संघर्ष कहाणी असते. करिअरला वेग मिळाल्यानंतर संघर्षाचे हेच दिवस आठवणी म्हणून कायम मनात राहतात. मराठीमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिनेसुद्धा काही तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. पॉकेटमनी मिळवण्यासाठी मृणाल वडिलांचे बूट पॉलिश करायची. ‘झी फाइव्ह’वरील एका चॅट शोदरम्यान मृणालने तिच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.

‘मला चित्र काढणे, रंगवणे, मेहंदी काढणे या गोष्टींची फार आवड होती. खर्चासाठी थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून मी लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायचे. वडिलांचे बूट पॉलिश केल्यावर मला दीड रुपये मिळायचे. पण ही काम करण्यातसुद्धा एक वेगळीच मजा होती,’ असं ती म्हणते.

आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात शिवानीची एण्ट्री झाली खरी पण..

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सुपर ३०’ या चित्रपटात मृणाल महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिने अभिनेता हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केलं आहे. ती लवकरच ‘नेटफ्लिक्स’वर येणाऱ्या ‘बाहुबली’च्या वेब सीरिजमध्येही मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचप्रमाणे ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रेक्षक-समीक्षकांकडून बरीच प्रशंसा झाली होती.