प्रत्येक विवाहित महिलेच्या आयुष्यात वटपौर्णिमा सणाचे एक वेगळेच महत्त्व असते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रत्येक स्त्री या दिवशी वटवृक्षाची पूजा करते. वटवृक्षाला संस्कृतमध्ये ‘अक्षयवृक्ष’ असे म्हटले जाते. ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘क्षय’ म्हणजे विनाश! ज्याचा कधीही विनाश होत नाही अर्थात जो पुन्हा जिवंत होतो, वाढत जातो तो अक्षय वृक्ष म्हणजेच वटवृक्ष! येत्या ८ आणि ९ तारखेला वटपौर्णिमा आहे. स्वाभाविकच त्या दिवशी सर्व लग्न झालेल्या स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतील. या महिलांमध्ये यंदा काही मराठी अभिनेत्रींचाही समावेश झाला आहे. गेल्या वर्षभरात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी सनई-चौघड्याचे सूर दुमदुमले. काहींचे लव्ह मॅरेज झाले तर काहींनी आपल्या कुटुंबियांच्या पसंतीला होकार देत अरेंज मॅरेज केले. त्यापैकी कोणत्या अभिनेत्रींची ही पहिली वटपौर्णिमा असणार ते जाणून घेऊया.
मृण्मयी देशपांडे
‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या मृण्मयी देशपांडेने ३ डिसेंबरला व्यावसायिक स्वप्नील राव याच्याशी लग्न केले. मृण्यमयी आणि स्वप्नीलचे अरेंज मॅरेज आहे. मृण्मयीने मालिकांबरोबरच ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘नटसम्राट’ या चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारली होती.
मनवा नाईक
याचवर्षी मार्च महिन्यात अभिनेत्री मनवाने निर्माता सुशांत तुंगारे याच्याशी विवाह केला. चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय करणाऱ्या मनवाने आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले असून, तिने सुशांतसह ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेची निर्मिती केली आहे. ‘सरस्वती’ या मालिकेची निर्मितीदेखील सुशांत तुंगारे याचीच आहे.
श्रुती मराठे
‘राधा ही बावरी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या श्रृती मराठेनेदेखील गेल्यावर्षीच लग्न केले. अभिनेता गौरव घाटणेकर आणि श्रुती ४ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. श्रुतीने मराठीतील मालिकांबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. श्रृती आणि गौरवची ओळख ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या चित्रपटादरम्यान झाली. त्यांच्या प्रेमाला जवळपास तीन वर्षे उलटल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
अक्षया गुरव
‘लव लग्न लोचा’ फेम अभिनेत्री अक्षया गुरवही काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली होती. सिनेमॅटोग्राफर भूषण वाणी याच्यासोबत अक्षया विवाहबंधनात अडकली. एका मित्राच्या निमित्ताने अक्षया आणि भूषणची ओळख झालेली. त्यानंतर त्यांच्या भेटगाठी वाढल्या, मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे तिचं तिलाही कळल नाही.
पल्लवी पाटील
‘रुंजी’ मालिकेने प्रसिद्धीस आलेल्या पल्लवीने संग्राम समेळ याच्याशी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न केले. संग्राम हा ‘पुढचं पाऊल’ मालिकेने प्रसिद्धीस आला होता.
अतुला दुग्गल
‘पुढचं पाऊल’ आणि ‘होणार सून मी या घरची’ या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अतुलानेही ४ डिसेंबर २०१६लाच लग्न केले. क्रिएटिव्ह दिग्दर्शक सिद्धव नाचणे याच्याशी तिचे लग्न झाले आहे. या दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. लग्नापूर्वी वर्षभर हे दोघे एकमेकांना डेट करत होते.