अभिनेता अजय देवगण लवकरच बाबा रामदेव यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती करणार आहे. पण हा बायोपिक सिनेमाच्या माध्यमातून नाही तर मालिकेच्या माध्यमातून लोकांना पाहता येणार आहे. रामदेव यांची भूमिका कोण साकारणार यासाठी गेल्या काही दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर या भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड झाल्याचे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.

या सीरिजमध्ये दोन टप्प्यांत रामदेव यांचे जीवन दाखवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील म्हणजेच बालपणातील रामदेव यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार नमन जैन साकारणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील भूमिका अभिनेता क्रांती प्रकाश झा साकारणार आहे. क्रांतीने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या मित्राची भूमिका साकारली होती. या मालिकेत बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक घटना दाखवल्या जाणार आहेत.

वाचा : वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी बिग बींचा पुढाकार

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजयने याविषयी म्हटले की, ‘या सीरिजची सर्वत्र बरीच चर्चा आहे. यातील मुख्य भूमिकेसाठी आम्हाला एका नव्या चेहऱ्याचा शोध होता. क्रांती ही भूमिका उत्तमरित्या साकारू शकेल असा मला विश्वास आहे.’ बाबा रामदेव यांनीसुद्धा क्रांतीच्या निवडीवर आनंद व्यक्त केला. ‘क्रांतीला जेव्हा मी भेटलो तेव्हा त्याची स्मरणशक्ती आणि संस्कृत श्लोक वाचण्याची क्षमता पाहूनच मी खूश झालो होतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आध्यात्मिकतेचा प्रभाव दिसून येतो,’ असे ते म्हणाले.