भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर साकारण्यात आलेल्या ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चरित्रपटाच्या ट्रेलरची त्याच्या सर्व चाहत्यांना उत्सुकता लागलेली होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटातील भूमिकेसाठी फार मेहनत घेतली असून, यासाठी त्याने क्रिकेटचे खास प्रशिक्षणही घेतले.
‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटात धोनीचा लहानपणापासून ते कॅप्टन कूल बनेपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे. ट्रेलरच्या शेवटी एका दृश्यात धोनी निवड समितीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलताना दिसतो. यात तो भारतीय संघातील तीन खेळाडू एकदिवसीय क्रिकेटसाठी आता योग्य नसल्याचे म्हणतो. जो धोनीला प्रमोट करतोय त्यालाच तो बाहेर काढायला बघतोय, केवळ या तिघांना बाहेर काढून धोनी गप्प बसणार नाही असे निवड समितीतील सभासद म्हणताना दिसतात. त्यावर धोनी म्हणतो की, आपण सर्वजण नोकर असून देशासाठी आपले कर्तव्य निभावत आहोत. मात्र, त्या तिनही खेळाडूंचा नाव ट्रेलरमध्ये घेण्यात आलेले नाही. पण वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकरला संघात जागा न देण्याचा आरोप धोनीवर सतत केला गेला. हा तो काळ होता जेव्हा संघ व्यवस्थापनाने संघातील अनुभवी खेळाडूंना रोटेशन पॉलिसी लागू केली होता. मात्र, टीम इंडियातून आपण बाहेर पडण्यामागे धोनीचा हात नसल्याचे वीरेंद्र सेहवागने स्पष्ट केले होते.
कॅप्टन कूलच्या जीवनावर साकारलेल्या या चित्रपटामध्ये अनुपम खेर, भूमिका चावला, कियारा आडवाणी यांसारखे कलाकारही झळकणार आहेत. नीरज पांडेंच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती अरुण पांडे आणि फॉक्स स्टुडिओद्वारे करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.