स्वच्छतागृहाची युद्धपातळीवर सफाई

कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातील स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने समाज माध्यमाद्वारे छायाचित्रांसह वास्तव प्रकाशात आणल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि युद्धपातळीवर या स्वच्छतागृहांची सफाई करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

मुक्ता बर्वे हिने फेसबुक पेजवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातील स्वच्छतागृहाची छायाचित्रेच प्रसिद्ध केली होती. सफाई कामगार कामावर नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असून ‘याला बेजबाबदारपणा म्हणायचा की उद्दामपणा’ असा प्रश्न प्रशासनाला विचारला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून या नाटय़गृहात सफाई कामगार नाहीत. त्याच्या निविदेवर कोणाची तरी सही नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. केवळ नाटकावर प्रेम करणारे प्रेक्षक आणि कलाकार यांना असेच गृहीत धरणार का, असा सवाल करीत मुक्ता बर्वे हिने सर्वच नाटय़गृहांत थोडय़ाफार फरकाने हीच परिस्थिती असल्याचे फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

मुक्ता बर्वे हिने आगपाखड केल्यानंतर लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि युद्धपातळीवर स्वच्छतागृहांची सफाई करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेविका वासंती जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाला तातडीने भेट दिली.

मोहोळ यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी संपर्क साधून नाटय़गृहाच्या दुरवस्थेची माहिती दिली आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या पुढील काळात पात्र कंपनीला स्वच्छतेचे काम देण्यास प्राधान्य राहील, असे मोहोळ यांनी सांगितले.