एकाच दिवशी तीन बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाल्याचा फटका कोणत्या ना कोणत्या चित्रपटाला बसतोच. असंच काहीसं गेल्या आठवड्यात झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या शुक्रवारी (३ ऑगस्ट) ‘मुल्क’, ‘फन्ने खान’ आणि ‘कारवां’ असे तीन बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्ही चित्रपटांची सोशल मीडियावर आणि सिनेरसिकांमध्ये फार चर्चा होती. पण एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने एकही चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. त्यातही इतर दोन चित्रपटांच्या तुलनेत ऋषी कपूर आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मुल्क’ने चांगली कमाई केली आहे.
अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘मुल्क’ने दोन दिवसांत ४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामध्ये ऋषी कपूर, तापसी पन्नू, प्रतीक बब्बर, रजत कपूर आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कोर्टरुम ड्रामा प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटात दहशतवाद, घातपात, हिंदू मुस्लीम वाद, हा मुल्क कुणाचा असे धगधगते प्रश्न हाताळण्यात आले आहेत. वाराणसीची धार्मिक पार्श्वभूमी चित्रपटाला आहे.
वाचा : ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीवर अपघातानंतर हल्ला
चित्रपटातील कलाकारांच्या दमदार अभिनयाची प्रशंसा प्रेक्षक- समीक्षकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ‘माऊथ पब्लिसिटी’चा या चित्रपटाला फायदा होणार हे नक्की. येत्या काही दिवसांत हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या ‘फन्ने खान’ चित्रपटाच्या कमाईची सुरुवात धीम्या गतीने झाली. इरफान खानच्या ‘कारवां’ चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.