अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल नेटवर्किंगवरुन संताप व्यक्त केला जात आहे. याच वक्तव्यावरुन आता कंगनाला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सुनावलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली आहे. कंगनाच्या या टीकेवर मराठी कलाकारांबरोबर हिंदी चित्रपट सृष्टीमधील अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र हे प्रकरण नक्की काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. हा नेमका वाद काय आणि कंगनाविरोधात संताप का व्यक्त होतोय यावरच टाकलेली ही नजर…

नक्की पाहा >> ‘आम्हाला घडवणारी मुंबई…’ कंगनावर संतापले मराठी कलाकार, जाणून घ्या रितेशपासून सईपर्यंत कोण काय म्हणालं…

सुशांत सिंह प्रकरणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भातील खुलासा समोर आल्यानंतर भाजपाचे आमदार राम कदम यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये कदम यांनी कंगणाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती.   “बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बॉलिवुडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे. पण, त्यासाठी तिला सुरक्षा देणं गरजेचं आहे. दुर्देवं म्हणजे १०० तास, ४ दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्र सरकारने अजून कंगनाला सुरक्षा पुरवलेलेली नाही”, असं ट्विट करत राम कदम यांनी कंगनाला सुरक्षेची मागणी केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही टॅग केलं होतं.

“सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे.

कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर त्यावर राम कदम यांनी पुन्हा रिप्लाय देताना एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. “अभिनेत्री कंगना रणौतचं, मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते हे विधान महाराष्ट्र सरकारसाठी खणखणीत चपराक आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप करुन महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला मलीन केलं” असं राम कदम म्हणाले होते.

कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. मुंबईची भीती वाटत असेल तर कंगनाने परत येऊ नये अशी टीका राऊत यांनी केली होती. या वक्तव्यावरुन राऊत यांच्यावर टीका करताना कंगानाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली.  “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि मी पुन्हा मुंबईत परत येऊ नये असं म्हटलं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता तर मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?,” असं ट्विट कंगानाने केलं.

राऊत म्हणाले, ‘हा काय तमाशा आहे?’

“जर हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील व्यक्ती राहत असेल आणि ती जर असं म्हणत असेल की माझा शिमला पोलिसांवर विश्वास नाही. अशा वेळी मी म्हणेल की जर विश्वासच नाही, तर शिमलामध्ये राहू नको. तुम्ही तिथं राहता, खाता, तिथं कमवता, ओळख मिळवता आणि शिमला पोलिसांवर थुंकता. मग हा काय तमाशा आहे. जर मी या राज्यात राहतो, तर माझा अधिकार आहे, पोलिसांसोबत संवाद ठेवण्याचा. जर मला काही समस्या असेल तर त्यांना सांगेल. कुणीही व्यक्ती मुंबई पोलीस, राज्य सरकार यांच्याविषयी बोलते. हे बरोबर नाहीये. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आवाहन करतो की, जे लोक मुंबई पोलिसांविषयी वाईट बोलत आहेत आणि राज्यातील जे राजकीय पक्ष अशा व्यक्तींचं समर्थन करत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करावी,” असं राऊत म्हणाले होते.

कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या याच ट्विटवरुन तिच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र आपण सरकारवर टीका केली असून यामध्ये मुंबईचे कौतुक न करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे कंगनाने म्हटलं आहे.