बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील सिनेमांची निर्मिती करून अॅपवर रिलीज करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला अटक केल्यापासूनच मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या हाती अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यातच अनेक अभिनेत्री आणि मॉडल्स पुढे येऊन अनेक गोष्टींचा खुलासा करत आहेत.
शिल्पा आणि राजच्या घरात छापा टाकल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता राज आणि शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांची चौकशी सुरु केली आहे. खास करून पंजाब नॅशनल बँकमध्ये असलेल्या त्यांच्या खात्याकडे पोलिसांनी आता मोर्चा वळवला आहे.
पंजाब नॅशनल बँकेत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचं जॉईन्ट अकाऊंट आहे. या बँक खात्यातून दोघांनी करोडो रुपयांचे ट्रांजेक्शन केले आहेत. त्यामुळे हॉटशॉट अॅपवरून होणारे व्यवहार याच अकाऊंटवरून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेच्या तपासात या खात्यामधून अप्रत्यक्षपणे पैश्यांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर आलंय.
या खात्यासोबत राज कुंद्राचं पंजाब नॅशनल बँकेत आणखी खातं असून ते फक्त राज कुंद्राच्या नावावर आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे २०१६ सालापासून या खात्यातून एकही व्यवहार झालेला नाही. या खात्यामध्ये आवश्यक असलेलं कमीत कमी बॅलेन्स देखील मेंटेंन करण्यात आलेलं नाही.
अश्लील सिनेमांच्या निर्मिती प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राची तसचं त्याच्या व्यवहारांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांच्या तपासात बँक खात्यातून होणारे व्यवहार अप्रत्यक्षपणे होत असल्याचं समोर आलंय. म्हणजेच अनेक वेगवेगळ्या खात्यांमधून राज आणि शिल्पात्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होत होती. गुन्हे शाखेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याला टेक्निकल भाषेत प्लेसमेंट, लेयरिंग, इंटीग्रेशन मोडस ऑपरेंडी असं म्हंटलं जातं.