‘द फॅमिली मॅन-२’ वेब सीरिज रिलीजनंतर चाहत्यांमध्ये या वेब शोमधील सर्वच कलाकारांची जोरदार चर्चा आहे. शोमधील श्रीकांत तिवारीनंतर सर्वात जास्त चर्चेत आले ते म्हणजे मिस्ट्री मॅन चेल्लम सर. या शोमधील चेल्लम सर यांची भूमिका तामिळ अभिनेते उदय महेश यांनी साकारली आहे. या शोनंतर चेल्लम सरांच्या मीम्सने तर धुमाकुळ घातला होता. एवढंच नाही तर तर उत्तर प्रदेश आणि मुंबई पोलिसांच्या ट्वीटर अकाऊंटवरून देखील चेल्लम सरांचे मीम्स शेअर करण्यात आले.

चेल्लम सरांचे मीम्स शेअर करण्यात आल्यानंतर अभिनेते उदय महेश यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, “जेव्हा लोकांनी माझे वेगवेगळे मीम्स व्हायरल करायला सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांना माझी भूमिका आवडल्याचं जाणवलं” असं ते म्हणाले. तर मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या एका मीमवर देखील उदय महेश यांनी एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, “मी खरोखरच मुंबई पोलिसांचा आभारी आहे. कारण त्यांनी एका चांगल्या कामासाठी माझ्या मीमचा वापर केला.”

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या मीमच्या कॅप्शनमध्ये एक संदेश देण्यात आला होता. “फ्री पिकअप आणि लॉकअपमध्ये वेळत.” असं कॅप्शन देण्यात आलं होतं. यात कोणत्याही वेळी पोलीस मदतीसाठी सतर्क आहेत हे सांगण्यात आलं होतं. तर हे ‘द फॅमिली मॅन-२’ चे क्रिएटर्स राज आणि डीके यांनी “तुमच्या विनोदी बुद्धीचं कौतुक” अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांच्या ट्वीटला दिली होती.

याआधी उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील चेल्लम सरांच्या मीम्सच्या मदतीने संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ‘द फॅमिली मॅन-२’ या वेब सीरिजमध्ये चेल्लम सरांची भूमिका केवळ १५ मिनिटांची आहे. मात्र या भूमिकेमुळे संपूर्ण शोला एक वेगळचं महत्व प्रात्र झालं.