उत्कृष्ट मीमद्वारे लोकांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचवण्यासाठी मुंबई पोलिसांचं ट्विटर अकाऊंट ओळखलं जातं. काळानुसार बदलत राहणं किती फायद्याचं असतं आणि ट्रेण्डनुसार लोकांपर्यंत पोहोचणं किती सोपं असतं हे त्यांच्या ट्विट्सकडे पाहून सहज लक्षात येतं. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सध्या ‘नेटफ्लिक्स’वर ‘मनी हाइस्ट’चा चौथा सिझन चांगलाच गाजतोय. या वेब सीरिजमधल्या प्रोफेसरच्या भूमिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. याच प्रोफेसरची मदत घेऊन मुंबई पोलिसांनी एक ट्विट केलं असून या ट्विटला नेटकऱ्यांची दाद मिळतेय.

लॉकडाउनमध्ये घरी राहण्याला किती महत्त्व आहे, हे या ट्विटमधून सांगण्यात आलंय. या मीमच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘लॉकडाउनमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत विनाकारण घराबाहेर जाण्याचा प्लॅन करता..’ याच्याच पुढे प्रोफेसरचा गाजलेला संवाद मीममध्ये जोडण्यात आला आहे, की ‘तर मग आपण आपली अक्कल गहाण ठेवली तर कसं?’

मुंबई पोलिसांचा हा मीम सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्याला चार हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर सातशेहून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. ‘जो कोणी मुंबई पोलिसांचा ट्विटर अकाऊंट हँडल करत आहे, तो खूप छान काम करतोय’, असं म्हणत कल्पकतेला नेटकऱ्यांनी दाद दिली आहे.

काय आहे मनी हाईस्ट?

मनी हाईस्ट ही नेटफ्लिक्सवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा चौथा सिझन ३ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला. भारतातही या वेब सीरिज प्रचंड लोकप्रिय आहे. यामध्ये मास्टरमाइंड प्रोफेसर काही जणांची टीम बनवतो. या टीमच्या साहाय्याने तो सर्वांत मोठ्या चोरीचा प्लॅन करतो.