मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चन यांनी अनेकदा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे. ‘जंजीर’ या सिनेमातून त्यांना खरी ओळख मिळायला सुरूवात झाली. या सिनेमाने हीट सिनेमा काय असतो याची ओळख अमिताभ यांना करून दिली. ‘जंजीर’ सिनेमात त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठवली होती. पण आता खुद्द मुंबई पोलीस अमिताभ यांच्या रंगात रंगली आहे असेच म्हणावे लागेल.
तुम्हाला खरं वाटत नाहीये का तर मग तुम्ही मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाऊंट एकदा बघाच. मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरचा जो कव्हर फोटो आहे त्यावरूनच सारं काही स्पष्ट होईल. या कव्हर फोटोवर ‘मोहब्बतें’ सिनेमातला ‘परंपरा, प्रतिष्ठा अनुशासन’ हा संवाद लिहिला आहे. ‘मोहब्बतें’ सिनेमात अमिताभ शिस्तप्रिय मुख्याध्यापक दाखवण्यात आले होते. ज्यांना परंपरा आणि शिस्त या गोष्टी इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात. मुंबई पोलिसही बिग बी यांच्या याच व्यक्तिरेखेपासून प्रभावीत झालेले दिसत आहेत.
https://twitter.com/MumbaiPolice/status/870141940666425344
जनतेत सायबर क्राइमविरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या सिनेमातला नावाजलेला संवाद वापरला आहे. यात बच्चन पोलीस अधिकाऱ्याच्या समोर बसून स्वतःची माहिती देतात. या संवादावर पोलिसांनी सल्ला दिला की, ऑनलाइन पोर्टलवर आपली सगळी माहिती देणं हे काही गर्वाची गोष्ट नाही.
https://twitter.com/MumbaiPolice/status/869385793713917953
ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हच्या विरोधात जनतेला जागरूक करण्यासाठी पोलिसांनी बच्चन यांच्या ‘सत्ते पे सत्ता’ या सिनेमाचा संवाद वापरला आहे. या संवादात अमजद खान यांच्या समोर बसून ते मद्य पिताना दाखवले आहेत. नंतर नशेत असतानाच ते दारू पिण्याचे दुष्परिणाम सांगताना या सीनमध्ये दाखवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी याच सीनचा वापर करून नशेत गाडी चालवल्यास आयुष्य बरबाद होऊ शकते हा सल्ला दिला आहे.
https://twitter.com/MumbaiPolice/status/869033538351452161
सायबर क्राइम गुन्ह्याविरोधात जनतेला जागरुक करण्यासाठी पोलिसांनी ‘शोले’ सिनेमातील जय, वीरू आणि बसंती यांच्या संवादाची मदत घेतली आहे. या सीनमध्ये अमिताभ हे हेमा मालिनी यांना ‘तुम्हारा नाम क्या है बसंती’ असा प्रश्न विचारतात. याचा आधार घेत मुंबई पोलिसांनी लिहिलंय की, जेव्हा सायबरचे गुन्हेगार तुमचं नाव काय? असा प्रश्न विचारतात तेव्हा अशा प्रश्नांची उत्तर देणं टाळा.
https://twitter.com/MumbaiPolice/status/870494552901201920
आर्थिक गुन्ह्यांविरोधात जागरुक करण्यासाठी बिग बी यांच्या ‘दीवार’ सिनेमातला ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’ या प्रसिद्ध संवादाचा वापर करण्यात आला आहे.
https://twitter.com/MumbaiPolice/status/869762229951897600
बेकायदेशीर पार्किंगविरोधात जनतेला जागरुक करण्याच्या उद्देशाने ‘कालिया’ सिनेमातला ‘हम जहां खडे हो जाते हैं, लाइन वहीं से शुरू होती है’ हा संवाद वापरण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांचा हा अभिनव प्रयोग खरंच वाखाणण्याजोगा आहे. मनोरंजन करत दिलेले ज्ञान जनतेला अधिक लक्षात राहते हे बहुधा पोलिसांना चांगलेच कळले आहे.