सध्या चित्रपटसृष्टीत कोणत्या संगीतकार जोडीची सर्वांत जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे अजय- अतुल. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाला त्यांनी दिलेल्या संगीताने सर्वांनाच ‘याड लावलं’. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांमध्ये संगीत देण्याचे बऱ्याच ऑफर्सही या जोडीला मिळू लागल्या. आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर सैराटचा हिंदी रिमेक ‘धडक’मध्येही ते संगीत देणार असल्याची माहिती होती. हे दोन मोठे प्रोजेक्ट हातात असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा चित्रपट अजय- अतुलला मिळाला आहे. आनंद एल राय दिग्दर्शित शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटासाठी अजय- अतुल संगीत देणार असल्याची माहिती ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिली आहे.

या चित्रपटासाठी आधी संगीतकार अमित त्रिवेदीची निवड करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अमितने निर्मात्यांना गाण्यांच्या काही चालीसुद्धा सुचवल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव अमितने यातून माघार घेतली आणि आता त्याच्या जागी अजय- अतुलची वर्णी लागली.
यासंदर्भात अमित त्रिवेदी आणि अजय- अतुलने अद्याप कोणतीही ठोस माहिती दिली नाही. अजय- अतुलकडे आता तीन चित्रपटांना संगीत देण्याची जबाबदारी आहे.

वाचा : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही ‘पद्मावती’वर बंदी

यापूर्वी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’साठी शंकर- एहसान- लॉयची निवड करण्यात आली होती. पण स्क्रीप्टमध्ये काही बदल केल्यामुळे आणि वेळेअभावी काही गोष्टींची पूर्तता करु न शकल्याने त्यांनी तो प्रोजेक्ट सोडला. या त्रिकूटानंतर अजय- अतुलची ‘ठग्स…’मध्ये थेट एण्ट्री झाली.