काही महिन्यांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि त्याची प्रेयसी समंथा रुथ प्रभू यांचा साखरपुडा झाला होता. आता त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. समंथा आणि चैतन्य येत्या ६ ऑक्टोबरला विवाहबद्ध होणार आहेत. व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली. दोघांच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करुन ‘समंथा आणि चैतन्य ६ ऑक्टोबरला विवाह बंधनात अडकणार आहेत, त्यामुळे तुमचे आधीच अभिनंदन करतो’ असे ट्विट त्यांनी केले.

https://www.instagram.com/p/BSBqLqvAYow/

नागा आणि समंथाचा जानेवारीमध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. फक्त जवळच्या कुटुंबियांसाठी असलेला हा सोहळा कोणत्याही लग्न सोहळ्यापेक्षा कमी नव्हता. आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत चैतन्य म्हणाला की, समंथा आणि माझ्या लग्नाबद्दल कोणी मला विचारलं की त्याचं उत्तर द्यायला मला आवडतं. मी कुठेही गेलो तरी आता मला माझ्या लग्नाबद्दल विचारतात. हे काही फार वेळ राहणार नाही. त्यामुळे मी या क्षणांचा सध्या आनंद लुटतोय.

 

सध्या समंथा आणि नागा हे दोघं डेस्टिनेशन वेडिंगच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त आहे. हे जरी डेस्टिनेशन वेडिंग असलं तरी लग्न मात्र पारंपारिक पद्धतीनेच होणार असे सांगितले जात आहे. नागा चैतन्य हा तेलगू सुपरस्टार नागार्जुनाच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. त्यानंतर नागार्जुनने अमला अक्किनेकी हिच्याशी विवाह केला. अमलापासूनही नागार्जुनला अखिल नावाचा मुलगा आहे. तोही एक अभिनेता आहे. अखिल आणि हैदराबादमधील डिझायनर श्रिया भुपाल हिचा साखरपुडा झाला होता. पण काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही. नागा आणि समंथाने २०१० मध्ये ‘ये माया चेसवे’ या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. तसेच ‘मनम’ आणि ‘ऑटोनगर सुरिया’ या सिनेमातही ते एकत्र दिसले होते.