२९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावले. या चित्रपटातले प्रत्येक गाणे आणि संवाद सुपरहिट ठरले. त्यासोबतच यातील कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच चित्रपटातून त्यांच्यातील अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. आर्चीची भूमिका साकारणीरी रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रिंकूने सैराट हिट ठरल्यानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर का नाकारल्या या मागचे कारण सांगितले आहे.
रिंकूने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, ‘सैराट चित्रपटाच्या यशानंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण अनेकांना सैराट सारखेच चित्रपट करायचे होते कारण सैराट हिट ठरला होता. सैराटमध्ये मी जी भूमिका साकारली त्याच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर मला येत होत्या. पण मला तशीच भूमिका परत साकारायची नव्हती. मला काही तरी वेगळे करायचे होते. त्यामुळे सैराटनंतर मी अनेक चित्रपटांना नकार दिला’ असे म्हटले.
आणखी वाचा : ‘जाती के बारे में क्यो न बोलू सर’, रिंकू राजगुरुच्या ‘२०० हल्ला हो’चा ट्रेलर प्रदर्शित
View this post on Instagram
पुढे तिला सैराट इतर भाषांमध्ये करण्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, ‘मी याविषयी काही बोलू शकत नाही. लोकांना करायचा असेल तर ते करु शकतात. कारण ते त्यांचे काम आहे. पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कारण मराठी चित्रपटांचा रिमेक हिंदीमध्ये होत नाही. उलट हिंदी चित्रपटांचे रिमेक मराठीमध्ये केले जातात. हा पहिला चित्रपट आहे ज्याचा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला.’
रिंकू लवकरच ‘२०० हल्ला हो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दलित महिलांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करण्यात येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत अमोल पालेकर आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. हा चित्रपट २० ऑगस्ट रोजी झी ५ या अॅपवर प्रदर्शित होणार आहे.