बिग बींचे सिनेमे पाहत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. ते सिनेमे पाहून काहींनी त्यांना एक चांगला अभिनेता मानले तर काहींनी देवाचीच उपमा त्यांना दिली. त्यांचे सिनेमे पाहत मोठे झालेल्या लाखो चाहत्यांपैकी एक नाव म्हणजे नागराज मंजुळे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांनी आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पाडला याचा छोटासा अनुभव नागराज यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर शेअर केला. खास गोष्ट म्हणजे अशी की नागराज यांनी ही पोस्ट चक्क हिंदीमध्ये शेअर केली आहे.
Bhoomi Trailer: संजय दत्तच्या डोळ्यातली आग स्वस्थ बसू देत नाही
अमिताभ यांच्या दीवार सिनेमातला फोटो शेअर करत नागराज म्हणाले की, ‘‘दीवार’ सिनेमा पाहिला, तेव्हा अमिताभ यांच्याप्रमाणे शर्टाला गाठ बांधून शाळेत जायचो. मार पडला, तरी सवय मोडली नाही. एवढंच काय तर माती वाहून नेणाऱ्या गाढवांना पळवून आम्ही शोलेचा खेळ खेळायचो. अर्थात ज्यांची गाढवं तोच अमिताभ व्हायचा. त्या खेळात मी सांभा असूनही आनंदी असायचो कारण त्या खेळाचे दिग्दर्शन मी करायचो. याराना पाहिल्यानंतर कच्चा पापड पक्का पापड असं जबरदस्ती बोलायला लावायचो.’
”शोले’, ‘याराना’, ‘डॉन’, ‘कुली’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘शहेनशाह’, ‘लावारिस’, ‘कालिया’, ‘शराबी’ अशा अनेक सिनेमांची कथा सांगून लोकांचे मनोरंजन करायचो.’ ‘ज्याचे सिनेमे पाहत लहानाचा मोठा झालो, तो या शतकाचा महानायक माझ्या पुढच्या हिंदी सिनेमाचा नायक आहे,’ अशा शब्दात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
‘सैराट’ आणि ‘फँड्री’ या सिनेमांच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे नव्या सिनेमावर काम करत आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन दिसणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या सिनेमाच्या माध्यमातून नागराज बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
नागराज मंजुळेंनी या कथेवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून काम केलं आणि अमिताभ बच्चन यांना जानेवारीमध्ये सिनेमाचं कथानक दाखवलं. अमिताभ बच्चन यांनी सिनेमाला होकार दिला असून या वर्षाअखेरपर्यंत सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.