प्रियांका चोप्राने बर्लिनमध्ये नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीमध्ये प्रियांकाने घातलेल्या तोकड्या ड्रेसवरून अनेक वाद झाले होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनी दौऱ्याला गेले होते. तिथे प्रियांकाही तिच्या ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेली होती. या भेटीदरम्यानचा फोटो प्रियांकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आणि क्षणार्धात नेटीझन्सने त्यावर टीका करण्यास सुरुवात केलेली. यावेळी तिने जो ड्रेस घातला होता त्यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
प्रियांकाची आई मधू चोप्राने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले की, ‘प्रियांकाचा ड्रेस व्यवस्थित होता, पूर्ण बाह्यांचे कपडे तिने घातले होते. प्रियांकाचे इतर कार्यक्रम आधीच ठरलेले असल्यामुळे तिला कपडे बदलायला वेळ मिळाला नाही. शिवाय ड्रेस बदलून साडी नेसण्यासाठीही ती त्यांच्याकडे वेळ मागू शकत नव्हती.’
प्रियांकाचे स्वागत ज्यांनी केले त्यांना यासंदर्भात विचारले असताना त्यांनाही काहीच अडचण नव्हती. शिवाय, प्रोटोकॉल अधिकाऱ्यांनाही याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे प्रियांकाच्या आईने सांगितले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रोटोकॉल अधिकाऱ्यांना प्रियांकाच्या ड्रेससंदर्भात काहीच तक्रार नव्हती. आपल्या कपड्यांच्या बाबतीत प्रियांका नेहमीच सजग असते. औपचारिक, अनौपचारिक भेटी, रेड कार्पेट कार्यक्रमांसाठीही ती एक दिवसाआधी तिचे कपडे विचारपूर्वक निवडते. इतकेच नाही तर एअरपोर्टवरही तिच्या लूकबाबत विशेष काळजी घेते,’ असे मधू चोप्रा यांनी सांगितले.
वाचा : जाणून घ्या कतरिनाच्या सौंदर्याचे रहस्य
देशाच्या पंतप्रधानांना भेटायला जाताना असे तोकडे कपडे घालणे योग्य आहे का असा प्रश्न तिला विचारण्यात येत होता. पण प्रियांकाने यावर कोणतीही शाब्दिक प्रतिक्रिया दिली नव्हती. पण दुसऱ्याच दिवशी तिने आईसोबतचा एका तोकड्या कपड्यातला ड्रेस सोशल मीडियावर शेअर केला होता. याला ‘लेग्ज फॉर डेज्’ असे कॅप्शन देऊन टिकाकारांना कृतीतून प्रत्युत्तर दिले होते.